बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदी सिनेमाचं असं नाव ज्याने आपल्या आयुष्यात केवळ खूप संघर्षच केला नाही, तर मोठ्या पडद्यावरही स्वतःची एक विशेष छाप देखील सोडली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने आतापर्यंत बॉलिवूडमधील बर्याच चित्रपटांमध्ये, आपल्या वेगळ्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पसरले आहेत. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जन्म 19 मे 1974 रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील ‘बुलढाणा’ या गावी झाला.
1996 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आपले घर सोडून दिल्ली येथे आले आणि येथे येऊन त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले. अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वप्ननगरी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला. चित्रपटांमधील छोट्या-छोट्या भूमिका मिळवण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला खूप संघर्ष करावा लागला. 1999 मध्ये आमीर खानच्या सरफरोश या चित्रपटमध्ये ते पहिल्यांदाच दिसले होते. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे केवळ काही मिनिटांचे पात्र होते.
‘गँग्स ऑफ वासेपुर’ने मिळवून दिली ओळख
यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी बर्याच चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसला, पण तोपर्यंत देखील त्यांना अपेक्षित स्थान मिळालं नाही. या हरहुन्नरी अभिनेत्याच्या नशिबात 2012 साली बदल झाला, जेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटाने त्यांना रातोरात एक उदयोन्मुख कलाकार बनवले. या चित्रपटात त्यांनी ‘फैजल खान’ची भूमिका साकारली आहे, ज्याच्यावर सिनेप्रेमी अजूनही प्रेम करतात.
नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या काही विशेष गाजलेल्या चित्रफिती
गँग्स ऑफ वासेपुर’ चित्रपटानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटानंतर त्याने ‘बदलापूर’, ‘मांझी द माउंटन’, ‘द लंच बॉक्स’, ‘रमण राघव 2’, ‘रईस’, ‘मंटो’ आणि ‘ठाकरे’ यासारख्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. केवळ चित्रपटांमध्येच नव्हे, तर नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी डिजिटल व्यासपीठावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
‘गणेश गायतोंडे’ आजही चर्चेत
‘सेक्रेड गेम्स’ ही हिंदी वेब सीरीज अतिशय लोकप्रिय वेब सीरीजपैकी एक आहे. या वेब सीरीजमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे व्यक्तिमत्व अभिनयाच्या जगात आणखी दृढ झाले आहे. 2018मध्ये आलेली ‘सेक्रेड गेम्स’ केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात बरीच चर्चिली गेली. वेब सीरीजमधील नवाजुद्दीन सिद्दीकी यांची व्यक्तिरेखा ‘गणेश गायतोंडे’चे लोक अजूनही खूप कौतुक करतात. ‘सेक्रेड गेम्स’ शिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीने आणखी बर्याच वेब सीरीजमध्ये काम केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा