------------------------------------------------------------
प्रा.डॉ. राजेंद्र जेऊर,
मिरज महाविद्यालय, मिरज
जि. सांगली
(मोबा.९२२६७८०१३१)
-------------------------------------------------------------
बुद्धाची सम्यकता, महावीरांची अहिंसा, येशूची सेवावृत्ती व सहनशीलता, पैगंबरांचा एकेश्वरवाद व निराकार ईश्वराची संकल्पना यांचा सुरेख संगम म्हणजे बसवण्णांचा लिंगायत धर्म होय.तिथीनुसार अक्षय तृतीया हा महामानव बसवण्णांचा जन्मदिन असून बसव जयंतीच्या निमित्ताने या महामानवाच्या विचारांना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न प्रस्तुत लेखात केला आहे.
भारतातील आजपर्यंतच्या सर्वच अवैदिक धर्मांचे उगमस्थान हे भारतातील प्रचलित जातीव्यवस्था,जातीभेद आणि त्यावर आधारित चातुर्वर्ण पद्धतीमुळे बहुजनांचे होणारे अमानवीय शोषण हेच राहिलेले आहे. भारतीय समाजाच्या अधोगतीचे आणि सर्व प्रकारच्या सामाजिक विषमतेचे मुळ कारण जात आणि जातीभेद हेच होते आणि आहे. विषमतेचे उच्चाटन आणि समतेचे प्रतिष्ठापन यासाठी 'जातीविरहित अशा विशाल समाजाची निर्मिती करणे' हे महात्मा बसवण्णांचे अंतिम ध्येय होते. हे ध्येय साध्य करण्याचा एकमेव, रामबाण उपाय म्हणजे स्वखुशीने व सर्वसंमत्तीने भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह अर्थात रोटी-बेटी व्यवहार घडवून आणणे होय. या शिवाय जाती-जातीतील उच्च-नीचता नष्ट होऊन जातिभेदाचा अंत होणे अशक्य आहे असे स्पष्ट मत बसवण्णांचे होते. हे कार्य अत्यंत क्लिष्ठ, गुंतागुंतीचे आणि महाकठीण असले तरी अशक्यप्राय नाही असा त्यांचा दृढ आत्मविश्वास होता.
समाजात एखादा अमुलाग्र बदल घडवून आणावयाचा असेल तर त्यासाठी केवळ कायदा करून चालत नाही, कायद्याच्या बडग्याने कदाचित व्यक्तिगत मानसिकता बदलता येऊ शकेल परंतु समाजाची मानसिकता बदलता येणे अशक्यप्राय गोष्ट आहे. याचसाठी बसवण्णांनी दृढनिश्चयाने अखंड आयुष्यभर आपल्या आचार-विचारातून समाजाची मानसिकता बदलण्यासाठी अविरत प्रयत्न केले. समाज परिवर्तन हे एकट्या-दुकट्याचे काम नाही, याची महात्मा बसवण्णांना चांगली जाणीव होती. या कठीणप्राय कार्यासाठी ‘अनुभव मंटप’ या संस्थेच्या माध्यमातून शुद्ध व तत्वनिष्ठ परंतु व्यवहारात साकार करता येणाऱ्या जबरदस्त अशा वैचारिक व धोरणात्मक संघटनेची उभारणी केली. तसेच अशा तत्वनिष्ठ विचारांवर अखंड, अविरत निष्ठा ठेऊन यश-अपयश, मान-अपमान एवढेच नव्हे तर मरणाची तमा न बाळगता समाज परिवर्तनाची मशाल हाती घेऊन दृढ संकल्पाने मार्गक्रमण करणाऱ्या नेतृत्वाची, अनुयायांची फळी तयार केली.
आजपर्यंतच्या समाजपरिवर्तनाच्या लढ्यात समाविष्ट असलेल्या पुरोगामी विचारांच्या संत, महंत, समाजसुधारकांप्रमाणे केवळ विचारपरिवर्तन मोहिमेतच न अडकता एक पाऊल पुढे टाकून १२व्या शतकातील तथाकथित स्वत:ला उच्च वर्णीय, कुलश्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या कर्मठवादी, कर्मकांडी, भोंदू, पुरोहितशाही वर्गाच्या विरोधाची तमा न बाळगता प्रत्यक्ष आचरणातून आंतरजातीय(अनुलोम) विवाहाच्या माध्यमातून जातीव्यवस्थेला मूठमाती देण्याचा प्रयत्न महात्मा बसवण्णांनी केला. हा भारताच्या इतिहासातील जातीअंताच्या लढाईतील पहिला वास्तववादी प्रयोग आहे. आज भारतात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढत आहे आणि उच्यवर्गीय म्हणवणारा समाजसुद्धा फार विरोध करत असताना दिसत नाही. यावरून असे म्हणण्यास हरकत नाही की महात्मा बसवण्णांना अपेक्षित असणाऱ्या समाजाचा पाया तयार होत आहे अर्थात जातीअंताच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली जात आहे, भारतीय समाजाच्या विकासाचा पर्व सुरु होत आहे. महात्मा बसवण्णांच्या या लढ्यालाच 'कल्याण क्रांती' असे म्हणतात. बसव जयंतीच्या निमित्ताने या कल्याणक्रांतीच्या तत्वज्ञानाच्या वैचारिक अधिष्ठानाची चर्चा करणे अगत्याचे आहे.
१. एकेश्वरवाद, निराकार ईश्वर, इष्ट्लिंग आणि जंगम:
बसवण्णा हे पक्के ईश्वरवादी होते. परंतु त्यांचा ईश्वर हा निराकार आणि एकमेव एक होता. तो सर्वव्यापी, सर्वांतर्यामी होता. सर्वांतर्यामी असणारा 'शिव' हाच या जगाचा खऱ्या अर्थाने मालक व नियंता असून तोच सर्व जीवांचा उद्धारक आणि अंतिम सत्य आहे. त्यांच्या काळात प्रचलित धर्मगुरु, पौरोहितशाही वर्गाने ३३ कोटी देवांची निर्मिती करून देवांना दगड आणि धातूच्या रूपाने देऊळ नावाच्या चार भिंतीच्या कोठडीत कोंडून घातले होते, देव त्यांच्या ताब्यात होता, त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही देवाचे दर्शन होत नव्हते. दगड, धातूच्या रूपाने देवळात कोंडलेला देव हा खरा देव नसून या पौरोहितशाही ऐतखाऊ वर्गाच्या ऐषारामी जीवनाच्या उत्पन्नाचे स्त्रोत आणि सामान्य श्रद्धावान भोळ्याभाबड्या लोकांच्या शोषणाचे अस्त्र होते हे बसवण्णांनी ओळखले होते. या गंभीर अशा दांभिकतेतून सामान्यांना बाहेर काढण्यासाठी ईश्वराचे खरे स्वरूप बसवण्णांनी बोली भाषेतून समजावून सांगितले. बसवण्णांच्या विचार आणि आचारांमुळे हे देहच पवित्र देवालय असून देव प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करतो हे लोकांना पटले. इष्ट्लिंग हे देवाचे प्रतिक म्हणून देऊन ते प्रत्येकाच्या गळ्यात आणि ते बरोबर हृदयावरती येईल असे परिधान करण्याची रीत सांगितली की ज्यामुळे सतत २४ तास परमेश्वर माझ्या समवेत आहे याची जाणीव होईल. ज्या लोकांना ईश्वराच्या दर्शनाचा, भक्तीचा अधिकार नव्हता अशांना तो अधिकार मिळाला. यामुळे सामान्य लोकांनी देवळाकडे पाठ फिरवली. स्वर्ग आणि नरक इतरत्र कोठे नसून ते आपल्या कृतीत आहेत. आपल्या सद्वर्तनाने इथेच स्वर्ग निर्माण करता येते आणि दुर्ववर्तनाने नरक. चराचरात भरलेल्या ईश्वराची पूजा करण्यासाठी कोणत्याही दलाल, मध्यस्थाची गरज नसते, असे करणे म्हणजे तो व्यभिचार आहे. सजीव, सचेतन देहच देवालय असेल तर निर्जीव दगडाचे देवालय व निर्जीव दगडातील देवाच्या मागे लागणे म्हणजे शुद्ध अज्ञान आहे हे सामान्यांना स्वानुभवाने पटले. जंगम ही जात किंवा पंथ नसून ती एक अवस्था अथवा पद आहे. बसवण्णांनी जंगमाला फार मोठे स्थान दिले आहे. जंगम हा ईश्वराचा साकार रूपातील प्रतिनिधी अर्थात ईश्वराचे प्रतिरूप आहे. जन्म, मरण आणि जीवन याचे रहस्य जाणणारा तो पूर्ण ज्ञानी आहे. तो संचारमूर्ती आहे, समाजाचा विश्वस्थ आहे, तो धर्मप्रचारक आहे, समाजाच्या वेदना जाणणारा जाणकार आहे. समाजाला जे दान द्यावयाचे ते जंगमाकडेच सुपूर्द करावयाचे असते. तो नि:स्वार्थी, नि:स्पृह असल्याकारणाने त्याच्याकडून कधीच कोणत्या गोष्टीचा अपव्यय, अपहार होणार नाही.
२. कायक (कर्तव्य), कैलास आणि दासोह:
कायक म्हणजे कर्तव्य. आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे, निष्ठेने, श्रेष्ठ- कनिष्ठ असा भेद न करता करणे. श्रम न करता खाणे हे अनैतिक, अशोभनीय आहे. प्रत्येकाने कोणते ना कोणते काम केलेच पाहिजे. कर्तव्य पुर्तीतच खरे सुख, समाधान आहे. एका वचनात बसवण्णा म्हणतात की, आपल्या कर्तव्यात मग्न असताना गुरु आले, जंगम आले नव्हे नव्हे तर साक्षात शिव जरी आले तरी कर्तव्य सोडून जाऊ नये, प्रथम कर्तव्य आणि नंतर सर्व काही. कर्तव्य पुर्ततेतच ईश्वर प्राप्ती आहे. कैलास याचा अर्थ ईश प्राप्ती अथवा आत्यंतिक सुख, आनंद प्राप्ती होय. श्रम करणे हे प्रत्येकाचे आध्य कर्तव्य आहे, श्रम न करता अन्न सेवन करण्याचा अधिकार कोणालाही नाही मग तो राजा असो की रंक. बसवण्णांच्या शरण धर्मात सर्व अविज्ञानवादी, अंधश्रध्दायुक्त कर्मकांडांचे सबळ पुराव्यानिशी खंडन केले आहे आणि मानवी श्रमाची प्रतिष्ठा, कर्तृत्वशक्ती आणि प्रयत्नवादी वृत्तीला सदैव प्राधान्य दिले आहे. दासोह हेही फार महत्वाचे तत्व आहे. प्रत्यकाने आपल्या कष्टातून जे मिळविलेले असते त्यातील काही भाग अथवा आपल्या गरजांची पूर्तता झाल्यानंतर जे शिल्लक राहते तो भाग समाजासाठी दातृत्वाच्या भावनेने नाही तर कर्तव्याच्या भावनेने सुपूर्त करणे होय. इस्लाम धर्मातील जकात या संकल्पनेशी जुळणारे हे तत्व आहे.
३. धर्म, धार्मिकता आणि नैतिकता :
बसवण्णा म्हणतात माणूस हा धार्मिक बनला पाहिजे. बसवण्णांच्या मते धर्म आणि धार्मिकता ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. धार्मिक बनण्यासाठी तो कोणत्यातरी प्रचलित धर्माचा लेबल लावलेला अनुयायी असलाच पाहिजे असे कदापि नाही. बसवण्णा म्हणतात धार्मिक बनण्यासाठी मनुष्य अंतरंगाने आणि बहिरंगाने शुद्ध असला पाहिजे. विचारशुद्धीने मानवाचे अंतरंग (मन) स्वच्छ व निर्मळ होते आणि शुद्ध विचाराने कर्म-कृती केल्यास मनुष्याचे आचार, बाह्यवर्तन शुद्ध होते यालाच बहिरंग शुद्धी म्हणतात. अंतरंग आणि बहिरंग शुद्धीने माणूस सदाचारी, सद्वर्तनी, कर्तव्यपरायण बनतो. यालाच बसवण्णा धार्मिक बनणे असे म्हणतात. नैतिकता हा मानवाच्या प्रत्येक कृतीचा पाया असला पाहिजे. नीतियुक्त कर्तव्यालाच बसवण्णा धार्मिकता म्हणतात. अशा धार्मिक व्यक्तींचा समाजच या भूतलावर चिरकाल शांततेने वास्तव्य करू शकतो, मानवतेचे संरक्षण करू शकतो. असा समाज निर्माण करणे हे बसवण्णांचे मुलभूत ध्येय्य होते. त्या ध्येय्याप्रत जाणे अनुभव मंटपामुळे शक्य झाले.
४. देऊळ संस्कृती, दैववादी प्रवृत्ती, कर्मकांडमुळे होणाऱ्या सामाजिक शोषणाचा निषेध
समाजातील नीतिमत्ता जशी जशी लोप पाऊ लागते त्यानुसार माणूस अधार्मिक अर्थात कर्तव्यच्युत बनू लागतो. दैववादी पृवृत्ती वाढीस लागते. देव आणि धर्माच्या नावाने समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड याचे प्राबल्य वाढते. यातून मानवा-मानवामध्ये संघर्ष, द्वेष, तिरस्कार, वैर, उच्च-नीच भेदभाव, सामाजिक, आर्थिक, राजकीय, संस्कृतीक, अध्यात्मिक विषमता निर्माण करणाऱ्या गोष्टी जन्म घेतात. अर्थात मानवा-मानवातील प्रेम, दया, विश्वास, करुणा यातून निर्माण होणारी सहृदयता आणि समता भाव यांना सुरुंग लावून मानवी समाजातील शांती नष्ट करून सामान्य जीवन संघर्षमय, क्लिष्ट, गुतागुंतीचे बनविणारी संस्कृती उदयास येते आणि सामान्य, भोळ्या-भाबड्या, कष्टकरी, श्रद्धाळू जनतेचे शोषण करणारा एक वर्ग निर्माण होतो, तो वर्ग म्हणजेच पौरोहितशाही वर्ग. हा वर्ग जाणीवपूर्वक देव, दैव, नशीब व धर्म या नावाने सर्वसामान्यांत यज्ञ-याग, होम-हवन, पूजा-पाठ, अशा अविज्ञानवादी विधी आणि कर्मकांडाचे स्तोम माजवतो. या विधी पूर्ण करण्याची मक्तेदारी पौरोहितशाही वर्गाकडेच येते. यातून बहुजन समाज नाडला जातो, मानसिक गुलाम बनतो, निरंतर शोषित बनतो. बसवण्णा म्हणतात सामाजिक शोषणाचे केंद्रबिंदू म्हणजे भारतातील देऊळ संस्कृती होय. ही संस्कृती मनुष्याला धार्मिक बनण्यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करते कारण यातच त्यांचे अस्तित्व आणि विकास सामावलेले असते. याच कारणास्तव बसवण्णांनी देऊळ संस्कृतीला विरोध करून नितीमत्तेवर व लोकशाही तत्वावर आधारित अनुभव मंटप नावाच्या संस्थेची स्थापन केली. बसवण्णांनी देऊळ संस्कृतीला सुरुंग लावल्यामुळे ते प्रचलित वैदिक, पौरोहितशाही वर्गाचे शत्रु बनले.
५. अनुभव मंटप: समतेचे आणि विज्ञानवादी विचारांचे विद्यापीठ:
अनुभव मंटप हे बसवण्णांच्या लिंगायत धर्म अर्थात शरण धर्माचे तत्वज्ञान, वचन साहित्य, आचार-विचारांचे माहेरघर आहे. समता, बंधुता आणि श्रमप्रतिष्ठा हा त्याचा मूलाधार होता.जातीच्या उच्चाटनाची ती प्रयोगशाळा होती. अनुभव मंटपात स्त्री आणि पुरुषांना मुक्त प्रवेश होता. जगात ईश्वर असून तो एकमेव एक, निराकार आणि सर्वत्र व्यापलेला आहे, हा बसवण्णांचा विचार अनुभव मंटपातील सर्वसामान्यांत दृढपणे रुजला होता. या विचारांची एक फळी बसवकल्याण मध्ये निर्माण झाली होती. यात प्रामुख्याने मादार चेन्नय्या, डोहार कक्कैय्या, अल्लम प्रभुदेव, सोलापूरचे सिद्धरामेश्वर, चन्नबसव, मडीवाळ माचीदेव, हडपद आप्पांना, नुली चंदैय्या, देवर दासमय्या, जेडर दासमय्या, सोद्दल बाचरस, शंकर दासमय्या, किन्नरी बोम्मय्या,रामन्ना, अमुगीदेव, मोळीगेय मारय्या, शिवनागमय्या, आय्दक्की मारय्या, चिक्क्य्या, उरलिंग पेद्दी, मरूळ शंकरदेव, अक्कनागम्मा, लिंगम्मा, अक्कमहादेवी, गुडडापूर दानंम्मा, रेम्मव्वे, रायम्मा, रेचम्मा, आय्दक्की लक्कम्मा, सातव्वे, संकव्वे, इत्यादि अनेक स्त्री-पुरुषांचा समावेश होता. यामध्ये सामान्य कष्टकरी, शेतकरी, माळी, कोळी, साळी, कुंभार, कोष्टी, महार, मांग, चांभार, धनगर, धोबी, न्हावी अशा अठरापगड जातीतील स्त्री-पुरुषांचा समावेश होता. शिवाय यामध्ये कुणी राज्य वैभव त्यागून आलेले राजे, वैद्यकीय क्षेत्रातील लोक, कला, नृत्य, गायन या क्षेत्रातील प्रतिभावंत स्वयंस्फूर्तीने येऊन सामावलेले होते.
६. वचन साहित्य: नीतिमत्तेचे तत्वज्ञान
अनुभव मंटपात प्रत्येकाला आपले विचार आणि अनुभव कथन करण्याचे स्वातंत्र्य असे. या विचार मंथनातून सत्य आणि सर्वमान्य तत्वांची पुष्टी होत असे त्यातून त्रिकालाबाधित सत्य वचनांची निर्मिती होत असे. या सत्य वचनांच्या एकत्रीकरणातून जे साहित्य बाहेर पडले तेच शरणांचे वचन साहित्य, लिंगायत धर्माचे तत्वज्ञान होय. या वचन साहित्यात चमत्कार, कर्मकांड, अंधश्रद्धा, जादूटोणा, स्वर्ग-नरक कल्पना, यज्ञ-याग, होम-हवन, पशुबळी, उपवास, व्रत-वैकल्ये, बहु देवो उपासना, नवस, सुतक इत्यादी सर्व गोष्टींचे उदाहरण पूर्वक खंडन करून श्रमप्रतिष्ठा, कर्तव्य-धर्म, स्त्री सन्मान आणि समानता, अस्पृश्यता उच्चाटन, दया, करुणा, सहकार्यभाव, बंधुता, सदाचार, विवेक इत्यादी सद्गुणांचे उदाहरण पूर्वक श्रेष्ठत्व स्पष्ट करून माणसाला माणूस म्हणून आनंदाने कसे जगता येईल याची तत्वे प्रस्थापित केली. या साहित्याची निर्मिती लोकभाषेत केल्यामुळे सर्वसामान्यांना ते कळले, ते पटले आणि असंख्यांनी ते स्वीकारले, त्यामुळे बसवादि शरणांचा नीतिधर्म हाच समाजधर्म बनला. अर्थात समाज दांभिकतेतून परावृत्त होऊन शुध्द धार्मिक, नैतिक बनला.
७. बसवकल्याण: मानवतेचे जागतिक केंद्र
बसवण्णांची वैयक्तिक ज्ञान-साधना आणि भक्तीभाव त्याचबरोबर बसवकल्याणातील बिज्जल राजाच्या राजदरबारातील प्रधानमंत्री पदाच्या माध्यमातून केलेली लोकांची कुशल सेवा यामुळे बिज्जल राजा बसवण्णांबाबत अतिशय प्रभावित झाला होता. त्यांच्या सत्य-शुद्ध कर्तव्यामुळे त्यांना व्यापकपणे राज्यमान्यता व लोकमान्यता मिळाली. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणे त्यांच्या विचारांना कल्याणमधील जनतेकडून मान्यता मिळाली, लोकांची कृतीही बसवण्णांच्या विचाराप्रमाणे नैतिक बनू लागली. लोक कष्टाळू, श्रम प्रतिष्ठित बनू लागले. एकमेकातील वैर-संघर्ष विसरून उच्च-नीच भेदास मूठमाती देऊन, लिंगभेद, जातीभेद विसरून समत्व, बंधुत्व भावनेने अर्थात विवेकी आणि नीतिने वागू लागले. त्यामुळे बसव कल्याण हे शांतीचे, समाधानाचे, आनंदाचे, मानवतेचे आदर्श केंद्र बनले. याची ख्याती दक्षिणेकडील तामिळनाडू पासून वर काश्मीर, अफगाणीस्तान पर्यंत पोहोचली. बसवण्णांच्या समतेच्या क्रांतीने प्रभावित होऊन भारत वर्षातील विवध प्रांतातून लोक बसवकल्याणला येऊ लागले, अनुभव मंटपात सहभागी होऊ लागले. याचे स्पष्ट दाखले वचन साहित्यात आहेत.
९. सनातन्यांचा संताप, बसवण्णांची कल्याण क्रांती अर्थात जातीअंताची लढाई-
अनुभव मंटपातील स्त्री-पुरुष समानता, अठरा पगड जातीच्या लोकांचे एकत्रीकरण, देऊळ संस्कृती आणि दगड-धातूच्या देवाचा अस्वीकार, कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांना कडाडून विरोध, दैववादी पृवृत्तीचा निषेध करू श्रमसंस्कृतीचा स्वीकार अशा गोष्टींमुळे तथाकथित प्रचलित कपटी, ऐतखाऊ सनातन्यांचा धंदा बुडू लागला होता. विवेक आणि सदाचाराचे प्राबल्य समाजात वाढल्यामुळे या मतलबी वर्गाच्या मुळावर घाव घातले जात होते. तत्कालीन पौरोहितशाही, सनातन्यांचा वर्ग जो बसवण्णांना पाण्यात पाहत होता तो आपल्या अस्तित्व आणि श्रेष्ठत्वाच्या अहंकारापोटी येनकेन प्रकारे बसवण्णांच्या समतेच्या चळवळीला खीळ घालण्याची संधी शोधत होता. नेमकी ती संधी त्यांना मिळाली. एकेकाळचे बसवण्णांचे कट्टर विरोधक, पूर्वाश्रमीचे चातुर्वण्य व्यवस्थेचे समर्थक, कर्मकांडावर श्रद्धा असणारे सनातनी ब्राह्मण आणि नंतरच्या काळात बसवण्णांच्या ज्ञान-तेजासमोर नतमस्तक होऊन बसवण्णांच्या लिंगायत चळवळीचे अनुयायी व शरण क्रांतीचे सक्रिय समर्थक बनलेले मधुवरस यांची कन्या रत्ना हिचा विवाह जातीने चांभार असलेल्या परंतु बसवण्णांच्या शरण धर्माचा पाईक असलेल्या हरळय्याचा पुत्र शीलवंत याच्याशी सर्व संमत्तीने ठरला. या विवाहाला अनुभव मंटपाची बिनशर्त संमती मिळाली; जातीअंताच्या लढाईची मुहूर्तमेढ रोवली गेली. परंतु सनातनी धर्ममार्तंडांची तळपायाची आग मस्तकाला गेली. या धर्ममार्तंडांनी सदर विवाहाला आंतरजातीय (अनुलोम) विवाहाचे लेप चढवून हे कृत्य म्हणजे धर्मद्रोह आहे, अशा कृतीमुळे धर्म भ्रष्ट होऊन समाजात अधर्म बळावतो, समाजात अराजकता निर्माण होते, समाज रसातळाला जातो असा डांगोरा पेटवून बसवण्णा आणि शरणांना बदनाम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या सर्वांचे कारण बसवण्णा हेच आहेत, त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांना आणि ते कृत्य करण्यास पाठिंबा देणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असा आग्रह तत्कालीन धर्ममार्तंड आणि बसवण्णांच्या सत्कार्याला सदैव अंतर्गत आणि बाह्य विरोध करत राहिलेल्या मंचण्णा आदींनी राजाकडे धरला. अनेक मार्गांनी राजा बिज्जळावरती दबाव आणला. यातून वरपिता मधुवरस, वधूपिता हरळय्या, शीलवंत आणि नववधू रत्ना यांना मरणदंडाची शिक्षा झाली. त्यांचे डोळे काढून हत्तीच्या पायाला बांधून ओढण्याची शिक्षा ठोठावली व बसवण्णांना हद्दपारीची शिक्षा झाली. यामुळे एकच हाहाकार उडाला. कल्याण मधील शरणांनी उग्ररूप धारण केले, अशातच राजा बिज्जळाचा वधही याच धर्ममार्तंडांनी आपल्या हस्तकांकरवी घडवून आणला आणि या वधाचा आरोप बसवण्णांचे अनुयायी वर्गांवर घातला. यामुळे शांतीप्रिय बसव कल्याणमध्ये वनवा पेटला. सनातनी धर्ममार्तंडांचे हस्तक, बिज्जलाचे सैन्य, आणि बसवानुयायी शरण यांच्यात युद्ध झाले. बसवण्णांना हे सहन न झाल्यामुळे ते कुडल संगमाकडे निघून गेले, त्यातील काही मंडळी अनुभव मंटपातील विचार मंथनातून निर्माण झालेल्या अमृततुल्य वचन साहित्याची शिदोरी सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने वाट दिसेल त्या दिशेने मार्गक्रमण करत गेले. येथे बसवण्णांच्या जाती-अंताच्या लढाईला पूर्णविराम मिळाला.
आंतरजातीय (अनुलोम) विवाह हे कल्याण क्रांतीचे तात्कालिक कारण असले तरी मुळ कारण हे चातुर्वर्ण, सनातनी, कर्मठ, पौरोहितशाही वर्गाच्या अस्तित्वाला बसवण्णांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून अखंड आणि अविरत परंतु तत्वनिष्ठ आणि विज्ञानवादी मार्गाने जो घणाघात घातला होता त्याचा तो परिपाक होता. सनातनी, जातीवादी, कर्मकांडवादी प्रवृत्ती बसवक्रांतीच्या विरोधासाठीची संधी शोधत होती, ती संधी मिळाली या अनुलोम विवाहाच्या निमित्ताने. अर्थात ही खरी लढाई प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी, अविवेकी विरुद्ध विवेकवादी, ऐतखाऊ विरुद्ध श्रमवादी, दांभिक विरुध्द वैज्ञानिक, जातीवादी विरुध्द समतावादी अशीच होती.
डॉ. राजेंद्र जेऊर सरांचा समतासूर्य बसवण्णा हा अत्यंत अभ्यास पूर्ण संशोधनपर लेख असून तो समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक आहे.
उत्तर द्याहटवाजेऊर सरांच्या पुरोगामी लेखनीला सविनय जयभीम.
जोड सरांच्या लेखातून बसव विचार साध्या सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोचतील असे वाटते अत्यंत सुंदर भाषेचे सौंदर्य लक्षात घेऊन मांडलेले विचार खरा बसवांना सर्वसामान्यांना समजावतील
उत्तर द्याहटवात्यांच्या भविष्यकालीन लिखाणास हार्दिक शुभेच्छा
जोड सरांच्या लेखातून बसव विचार साध्या सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोचतील असे वाटते अत्यंत सुंदर भाषेचे सौंदर्य लक्षात घेऊन मांडलेले विचार खरा बसवांना सर्वसामान्यांना समजावतील
उत्तर द्याहटवात्यांच्या भविष्यकालीन लिखाणास हार्दिक शुभेच्छा
डॉ. जेऊर सराच्या लेखातून कार्यक्षम व समताधिष्टीत समाजा साठी प्रेरणा देणारा व बसवण्णा चे विचार सर्व . सामान्या पर्यत पोहचविणारा हा लेख आहे सराच्या पुढीक कार्यास शुभेच्छा : धन्यवाद ...
उत्तर द्याहटवाअतिशय माहिती पूर्ण लिखाण आहे सर. धन्यवाद
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाअतिशय माहितीपूर्ण लेख आहे. बसवेश्वर हे एक सर्व धर्म सहिष्णू, विज्ञानवादी पुरोगामी विचारांचे महान संत आहेत.
उत्तर द्याहटवा