![]() |
कालवश प्रा. वर्धमान भवरे |
कोरोना आपल्या जीवनात निष्ठुर होऊन आला व बघता बघता आपल्या जवळची माणसे निघून जाऊ लागली. गेल्या वर्षभरापासून बरेच सहकारी, मित्र, परिचित यांचा दुर्देवी अंत पाहिला. मात्र प्रा.वर्धमान भवरे यांची निधनाची बातमी समजली तेव्हा काही क्षण सर्व काही स्तब्ध झालं. सरांच्या बरोबर घालवलेली वेळ, त्यांचं बोलणं, नेहमीची धडपड ,कोल्हापूर, मुंबई, पुणे येथील त्यांची प्रशासकीय कामाची माहिती व त्यांचा परिवार हे एका क्षणात डोळ्यासमोर भरभर येऊ लागलं.
विद्यार्थि दशेपासून सुरु झालेला त्यांचा संघर्ष आजपर्यंत सुरू होता. ८ ते ९ वर्षांपूर्वी जेव्हा ते जयसिंगपूर कॉलेजमध्ये मराठी विषयासाठी कनिष्ठ विभागात सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाले ते ही एका संघर्षातूनच झाला. तो संघर्ष तिथेच थांबला नाही ते रुजू झाल्यानंतर लागलेली भरती बंदी त्यानंतर मान्यतेसाठी त्यांनी रात्रंदिवस एक करून मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे न थकता प्रयत्न करून आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांचे मान्यतेचे काम त्यांच्या धडपडीतून झाले. तरुणपणापासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एक निष्ठावंत व आक्रमक शिलेदार म्हणून त्यांनी केलेलं काम डोळ्यासमोरून जात नाही . देशातील कुठल्याही शेतकरी संघटना विषयी त्यांना आपसूकच आदर होता त्यासाठी ते शेतकऱ्याच्या आंदोलनात हिरीरीने सहभागी होत होते. आता मात्र प्राध्यापक झाल्यापासून त्यांची नाळ शेतकरी संघटनेने बरोबर शिक्षकांच्या न्याय व हक्काच्या संघर्षासाठी जोडली गेली.
कालवश प्रा.आर.आर.पाटील यांचे ते अत्यंत जिवलग मित्र होते त्यांच्या अचानक जाण्याने ते अत्यंत अस्वस्थ झाले होते. मात्र एक सच्चा मित्र म्हणून त्यांनी पाटील कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत केली किंबहुना पाटील यांच्या कुटुंबीयांना पेन्शन व इतर आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी खूप धडपड करून त्यांना ते मिळवून ही दिले. पाटील यांच्या कुटुंबियांना एका हक्काचा व पालकत्वाच्या नात्याने सढळ हातांनी वाटेल ती मदत करीत होते.
प्रा. वर्धमान भवरे हे सातत्याने विद्यार्थीहीत व संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी धडपडणारा व कार्यशील अशा या रांगड्या प्राध्यापकाचे आता कुठे तरी पाहिलेल्या आनंदी स्वप्नांची सुरुवात चांगल्या दिवसांनी होणार होती. बरीच स्वप्ने पूर्ण करण्याच्या मार्गावर ते मार्गस्थ होणार होते. मात्र नियतीला काही औरच मान्य होतं त्यांना काही दिवसापूर्वी कोरोनाचे निमित्त झाले.
मात्र आम्हाला एक विश्वास होता की हा माणूस रांगडा, चळवळीतला आघाडीचा कार्यकर्ता व निर्भिड असल्यामुळे कोरोना संकटावर मात करून निश्चितच बरा होईल अशी आम्हाला शतप्रतिशत खात्री होती.मात्र आयुष्यभर संघर्षमय प्रवास करून अत्यंत तरुणपणी वयाच्या ३६ व्या वर्षी या संघर्षाचा अंत असा दुर्दैवीपणे होईल असे वाटले नाही आणि माझा काही क्षण या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी व एक मुलगा आहे.
या त्यांच्या आकस्मिक निधनाने जयसिंगपूर कॉलेज स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे,सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील,संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, सर्व उपप्राचार्य, सीनियर व ज्युनियर विभागातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधिक्षक, प्रशासकीय सेवक, कर्मचारी व विद्यार्थी हे सर्वजण अत्यंत अस्वस्थ असून कालवश प्रा. वर्धमान भवरे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली......
प्रा.डॉ. महावीर बुरसे
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर
ता.शिरोळ जि. कोल्हापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा