रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरून वाहणाऱ्या दत्तवाड गावच्या दूधगंगा नदीत मगरींचा वावर असल्याचे अनेकदा नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. वन विभागाला तशी माहिती कळविण्यात आली आहे. दहा ते पंधरा फूट लांबीच्या तीन ते चार मगरींच्या मुळे नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो हे माहित होऊनही वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे दत्तवाड येथील अनिल शिरढोणे या शेत्तमजुरास आपला जीव गमवावा लागला असता. शिरढोणे हे नदीपात्रात घोड्यांना पोहण्यासाठी घेऊन गेले होते. घोड्याची दोरी धरून घोडे पुढे व शिरढोणे मागे पोहत असताना पाठीमागून हल्ल्याच्या तयारीत असणारी मगर नदीकाठावर असणाऱ्या अनेक तरुणांच्या सह अनिल शिरढोणे यांच्या पुतण्याच्या निदर्शनास आली. काठावरून आरडाओरड सुरू झाली. पण शिरढोणे यांना आपल्या मागे काळ उभा आहे याची पुसटशी कल्पना देखील नव्हती.पाण्याच्या आवाजामुळे नदीकाठावरील गोंगाट निटसा ऐकू येत नव्हता. पण पुतण्याने जिवाच्या आकांताने फोडलेली किंकाळी मात्र शिरढोण यांच्या कानी पडली. त्याचक्षणी पोहता पोहता त्यांनी मागे वळून पाहिले. तर जबडा उघडून मानेजवळ आलेली मगर पाहून शिरढोणे यांना जबर धक्काच बसला. आणि वळताना त्यांचा कोपर मगरीच्या या नाकावर आपटला. तात्काळ शिरढोणे यांनी हातातील घोड्याची दोरी सोडली आणि खाली पाण्यात बुडले मगरीने नव्या जोमाने हल्ला केला. पण तो शिरढोणे यांच्यावरील हुकला आणि घोड्यावर झाला. शिरढोणे पूर्ण शक्तीनिशी पोहत नदीकाठावर आले आणि त्यांचा जीव वाचला. परंतु लेकरा सारखं प्रेम करून लहानाचा मोठा केलेला घोडा मात्र गमवावा लागला. दतवाड नदीपात्रातील गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी घटना असून यापूर्वी एकदा वासरावर मगरीने हल्ला करून वासरास फस्त केले होते. सदरच्या मगरी हिंसक झाल्याने मनुष्य प्राण्याना धोका निर्माण झाला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच अनिल शिरढोणे यांना घोडा गमावून जीव वाचवता आला आहे. वेळीच वनविभागाने त्याची दखल घेऊन झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी तसेच वेळीच हिंसक मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Chaan batami
उत्तर द्याहटवा