Breaking

गुरुवार, २० मे, २०२१

"कोरोना काळातला चटका लावणारा मृत्यू."

 

वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ. भालचंद्र काकडे


        कोरोनारूपी राक्षसाने अनेक सोन्यासारखी माणसे आमच्यापासून कायमची दूरावून टाकली. चेन्नईतल्या एस आर एम रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. भालचंद्र काकडे याची शोकांतिका माझ्या काळजाला जोराचा चटका लावून गेली. कोल्हापूरचा असणारा आणि तिथल्या शिवाजी विद्यापीठात शिकलेल्या भालचंद्रचा आतेभाऊ शुक्राचार्य ऊरुणकर हा माझ्या दवाखान्यातला असिस्टंट. आठदहा वर्षांपूर्वी भालचंद्र माझ्याकडे येऊन भेटून गेल्याचे आठवते. त्याला आमच्या जयसिंगपूर कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून काम करण्याची इच्छा होती. पण दुर्दैवाने तेव्हा आमच्याकडे जागाच रिक्त नव्हती. कमालीची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तीव्र संशोधक वृत्ती असणाऱ्या या उमद्या शास्त्रज्ञाने ऑक्सिजन, हैड्रोजन पासून इंधन निर्मिती नि प्लॅटिनम आदीविषयी मूलभूत संशोधन करून त्यासंबंधीची आंतरराष्ट्रीय पातळीवरची तब्बल सात पेटंटस् आपल्या नावाने कोरुन ठेवलेली आहेत.

        अखंड ज्ञानसाधनेत मग्न असणारा हा हाडाचा शिक्षक-संशोधक चेन्नईत करोनाने आजारी पडतो, तिथले त्याचे विद्यार्थी त्याला शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करतात, त्याच्या औषधपाण्यासाठी खूप धडपडतात. त्याला वेळेत ऑक्सिजन.. औषधे मिळाली नाहीत असे मला कळाले. त्याचे विद्यार्थी शेवटपर्यंत त्यासाठी झगडत.. धडपडत राहिले ; पण शेवटी ते हरले,आणि अवघ्या चव्वेचाळीसाव्या वर्षी तेजस्वी बुद्धिमान ताऱ्याला या लढाईत प्राण गमवावे लागले. तिथल्या संस्थेत त्याला झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती म्हणे ! ती सुरक्षा काय चाटायची? काय उपयोग तिचा? खरे तर रुग्णालयात त्याला उपचार युद्ध पातळीवर प्रयत्न करून उपलब्ध करून द्यायला हवे होते. एक तरुण, बुद्धिमान शास्त्रज्ञच नव्हे तर त्याचं आणि त्याबरोबर आपल्या देशाचं लखलखतं भविष्य आपण गमावून बसलो आहोत.

         या देशातले बुद्धिजीवी.... शिक्षक, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, तत्वज्ञ, कवी, लेखक अशा सर्वांबद्दल सर्व पातळ्यांवर असलेली अनास्था सर्वांनाच शरम आणणारी आहे. आपण असहाय्य झालो आहोत का ?

डॉ. भालचंद्र काकडे महाराष्ट्रात असता तर काही वेगळे घडले असते अशी उगीचच मनाला हुरहुर वाटत रहाते.


          डॉ. महावीर अक्कोळे.

      प्रसिद्ध धन्वंतरी, जयसिंगपूर (कोल्हापूर).

२ टिप्पण्या: