Breaking

सोमवार, १७ मे, २०२१

"सांगली शहरात 'एकच टास्क, वापरा मास्क'या स्लोगनच्या माध्यमातून सायकलीवरून जनजागृती - शिवाजी विद्यापीठाचे माजी NSS समन्वयक प्रा. संजय ठिगळे"




ॲड.प्रविणकुमार माने/ उपसंपादक :


        कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर 'एकच टास्क वापरा मास्क' या उपक्रमाचा अवलंब प्रभावीपणे करावा लागेल. विशेषतः तरुणाईने स्वतः मास्क वापरला पाहिजे.त्याबरोबरच इतरांचेही प्रबोधन करावे असे मत प्रा. संजय ठिगळे यांनी व्यक्त केले.

        सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे अभ्यासक व शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम समन्वयक प्रा.संजय ठिगळे यांनी 'लढा कोरोना मुक्तीचा' हा उपक्रम राबिवला असून या उपक्रमाअंतर्गत त्यांनी एकच टास्क, वापरा  मास्क ' ही मोहीम राबविली असून या मोहिमेअंतर्गत  ते सायकलवरून फिरताना लोकांना मास्क वापरण्याविषयी व सामाजिक अंतर राखण्याविषयी प्रबोधन करतात.  

 


        प्रबोधन मोहिमेविषयी बोलताना प्रा.संजय ठिगळे म्हणाले की,

गावे व शहरे कोरोनामुक्त करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाच्या अश्वावर आरूढ झालेल्या देशातल्या तरुणाईने अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. अत्यावश्यक सेवेतील घटक ज्या पद्धतीने कार्यरत आहेत त्यांचा आदर्श घेऊन कार्यरत राहिले पाहिजे.माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसंगी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून प्रबोधन करण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर स्वतः तणाव मुक्त राहून इतरांना कसे तणाव मुक्त ठेवता येईल या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजेत. इथून पुढच्या काळात सरकारने अनेक क्षेत्रात हळू हळू शिथिलता आणली तरी आपण कोरोनापासून पूर्णपणे मुक्त झालो आहोत असे गृहीत धरून आपण मास्कविना समाजात फिरू लागलो तर स्वतः बरोबरच दुसऱ्याचेही आरोग्य धोक्यात येईल. सद्यस्थितीत गरज नसताना बाहेर पडणे, सामाजिक अंतर न पाळणे आणि मास्कचा वापर टाळणे या सवयी अनेकांच्या जीविताला धोक्यात आणणाऱ्या आहेत त्यामुळे सार्वजनिक हिताचा विचार करून दक्षता घेतली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा