Breaking

बुधवार, २ जून, २०२१

बारावी सीबीएसई परीक्षा रद्द ! महाराष्ट्र शासनाचेही परीक्षा रद्द चे संकेत.




मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यापाठोपाठ ‘सीआयएससीई’नेही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. राज्य मंडळाने किंवा राज्याच्या शिक्षण विभागाने बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत भूमिका जाहीर केली नसली तरी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.


पुन्हा परीक्षा देण्याची संधी!


बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांना पर्यायी पद्धतीने दिलेला निकाल मान्य नसेल किंवा परीक्षा देण्याची इच्छा असेल त्यांना करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे.


परीक्षा रद्द चे परिणाम काय?


वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, विधि, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन यांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश हे देशपातळीवरील किंवा राज्यपातळीवरील प्रवेश परीक्षांच्या निकालानुसार होतात. राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचे महत्त्व पात्रतेपुरते मर्यादित आहे. मात्र देशपातळीवरील काही संस्थांमध्ये बारावीचा निकाल आणि प्रवेश परीक्षा या दोन्हीचे गुण ग्राह्य़ धरण्यात येतात. परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे मिळणाऱ्या गुणांवर हे प्रवेश दिले जाणार का, असा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्याचप्रमाणे अव्यावसायिक किंवा पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे विद्यापीठ पातळीवर बारावीच्या गुणांच्या आधारे देण्यात येतात. परीक्षा रद्द झाल्यामुळे त्यावरही परिणाम होणार आहे.

राज्याची भूमिका काय ?


दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या सीबीएसईच्या भूमिकेचे अनुकरण करत शिक्षण विभागाने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द केली होती. राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, असा अभिप्राय राज्याने दिला होता. ‘बारावीची परीक्षा रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय स्वागतार्ह आहे. राज्याचा निर्णयही लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य आहे,’ असे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी सांगितले.


अकरावीच्या गुणांवर मूल्यमापन?


राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांचे नववीतील गुण, दहावीच्या वर्षांतील कामगिरी आणि प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा यांच्याआधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या परीक्षा रद्द केल्यास या विद्यार्थ्यांचा निकालही अकरावीचे गुण आणि बारावीच्या वर्षांतील कामगिरीच्या आधारे जाहीर करण्याचा पर्याय मंडळासमोर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा