Breaking

मंगळवार, ८ जून, २०२१

अंधश्रध्देचा अघोरी प्रकार! अवघ्या 15 दिवसाच्या रेड्याचे डागणीने काढले दोन्ही डोळे, कानही कापले.



सांगली: ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अंधश्रद्धेतून लिंबू, कोंबडी उतरवून टाकण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. तसंच देवाच्या नावे रेडा आणि बोकडाचा बळी देण्याची प्रथा देखील सुरू आहेच. पण मिरज तालुक्यातील टाकळी येथे अंधश्रद्धेच्या अघोरी प्रकारातून 15 दिवसाच्या रेड्याचे डागणीने डोळे काढून कान जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.


 घरात भरभराट व्हावी या अंधश्रद्धेतून रेड्यावर अशाप्रकारचे अमानुष अत्याचार कारण्यात आले आहेत. दरम्यान, ही धक्कादायक माहिती समोर येताच ' अॅनीमल राहत' या संघटनेने असं भयंकर कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


रेड्याचे डोळे आणि कान जाळून त्यास टाकळी बोलवाड येथील ओढ्यात दोन दिवसांपूर्वी अज्ञातानी सोडले होते. डोळे डागणीने जाळण्यात आल्याने रेडा पूर्णपणे अंध झाला आहे.


सदर रेडा इकडे तिकडे भटकत असताना टाकळी येथील शेतकरी सचिन कोठावळे यांच्या हा अघोरी प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी याबाबत तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना माहिती दिली. ही माहिती मिळताच बाळासाहेब पाटील यांनी त्या रेड्यास आपल्या घरी आणले.


बाळासाहेब पाटील यांनी ॲनिमल राहत संस्थेचे किरण नाईक, दिलीप शिंगणे यांना माहिती दिली. यावेळी जखमी रेड्यास अॅनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. ॲनिमल राहत संस्थेने त्या रेड्यास उपचारासाठी नेले आहे.


अवघे पंधरा दिवस वय असलेल्या रेड्याचे डोळे काढून त्याचे कान जाळणे हा अघोरी प्रकार सातत्याने दिसून येत आहे. अशा अघोरी प्रकारातून जनावरांना वेदना पोहोचवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अॅनिमल राहतच्या किरण नाईक आणि बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा