![]() |
ग्लोबल टीचर रणजीत डिसले गुरुजी |
प्रा.अक्षय माने / कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :
भारताच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच असं घडलं आणि एका मराठी शिक्षकांने शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्थान स्वकर्तुत्वाने मिळवले. खरं म्हणजे आता सर्वांना सुपरिचित असणारे हे व्यक्तिमत्व तसेच तमाम भारतीयांना सार्थ अभिमान वाटावा आणि ग्रामीण भागातून शैक्षणिक गुणवत्तेचा आंतरराष्ट्रीय प्रवास लाभलेले एक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व बार्शीचे ग्लोबल टिचर रणजीत डिसले गुरुजी होय.
जागतिक बँकेने शैक्षणिक सल्लागार म्हणून या मराठीमोळ्या डिसले गुरुजींची नेमणूक जून २०२१ ते जुने २०२४ अशा तीन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळी मध्ये वाढ करण्याच्या हेतूने प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमध्ये नेतृत्व विकसित करणे, शिक्षकांना कला सुसंगत प्रशिक्षण देणे तसेच जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे अशाप्रकारची उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेले आहेत. त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जगभरातील १२ व्यक्तींची शैक्षणिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्या १२ व्यक्तीमध्ये भारताच्या रणजीत डिसले गुरुजीचे स्थान मिळवले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे तालुका माढा मु.पो.परितेवाडी शाळेत मागील ११ वर्षापासून डिसले गुरुजी शैक्षणिक तंत्रज्ञानातील आधुनिक व नवीनतम प्रयोगामुळे जगभर परिचयाचे झाले आहेत. त्यांनी आपल्या अभिनव प्रयोगाशीलतेद्वारे तयार केलेली 'क्यूआर कोड' शैक्षणिक पाठ्यपुस्तके सध्या अनेक देशातील दहा कोटी पेक्षा जास्त मुले वापरत आहेत. व्हर्चुअल फील्ड ट्रिप या आधुनिक अध्यापन पद्धतीने अनेक देशातील मुलांना विज्ञान विषय शिकवितात.
रणजीत डिसले गुरुजींची जागतिक बँकेच्या शैक्षणिक सल्लागार पदी निवड झाल्यामुळे भारताचे स्थान जागतिक पटलावर शीर्षस्थानी अधोरेखित झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा