![]() |
प्रा.डॉ. प्रशांत फडणीस |
प्रा.डॉ. प्रशांत फडणीस
प्रमुख,अर्थशास्त्र विभाग
बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण
संपर्क : 9421284056
pyphadnis@rediffmail.com
भारतीय पुराण कथांमधून इंद्र पदाचे महत्त्व अनेकदा विशद केले आहे. इंद्रपद टिकविण्यासाठी इंद्राने देव, दानव आणि मानवावर केलेली अनेक कपट कारस्थाने पुराण कथांमधून समोर येतात. हाव, लालसा आणि उपभोग प्रवृत्तीचे द्योतक असलेले इंद्रपद कलियुगातही वलय राखून आहे. हा संदर्भ यासाठी की इंद्रपदाची म्हणजे महासत्तेची लालसा आज अमेरिका आणि चीन या देशांमध्ये दिसत आहे आणि म्हणूनच जागतिक महासत्ता या पदाला वलय प्राप्त झाले आहे.
अनेक दशके अमेरिका हे पद सांभाळून आहे आणि इंद्रा प्रमाणेच अनेक छल, कपट कारस्थाने करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) व जागतिक बँक ही दोन आयुधे वापरून अमेरिकेने बहुतेक देशांना स्वतःचे मांडलीक केले आहे. कोणालाही गुलाम बनवायचे असेल तर त्याला आर्थिक लाचार करा या चर्चिल नीतीचा अमेरिकेने पुरेपूर वापर केला. जागतिक पटावर साम, दाम व दंड भेदाचा वापर करून प्रसंगी इतर देशांचा प्याद्याप्रमाणे वापर करून अमेरिका महासत्ता बनली. तेल आणि आखाती देशांवर वर्चस्व निर्माण करून आंतरराष्ट्रीय व्यापारात दबदबा निर्माण करण्यासाठी अमेरिकेने इतरांच्या अर्थव्यवस्थेत मनमानी लुडबुड केली. इतकेच नव्हे तर ओसामा बिन लादेन आणि सद्दाम हुसेन या दोन दानवांना खतपाणी घालून पोसले व जगावर भीतीचे साम्राज्य पसरवले व गरज सरताच त्याना यमसधनी धाडले. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणत म्हणत स्वतःची हुकूमशाही निर्माण केली.
२० व्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण देश आपल्या अर्थव्यवस्था खुल्या करीत असताना साम्यवादी चीन मात्र शांत होता. अर्थात चीनच्या अंतर्गत सुरू असलेला विद्रोह 2005 नंतर उजेडात आला जेंव्हा अमेरिकेच्या जागतिक महासत्ता पदाला टक्कर देऊ लागला. संपूर्ण जगाने चीनची आमुलाग्र प्रगती याची देही याची डोळा अनुभवली आणि यातूनच निर्माण झाला तो महासत्तेचा संघर्ष.
असे म्हणतात कितीतरी महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल पण ही मत मतांतरे आहे की,महायुद्ध जैविक अस्त्रांनी लढले जाईल. आजची कोरोनाच्या विळख्याची स्थिती ही एक प्रकारे जागतिक महायुद्धाची सुरुवातच म्हणावी लागेल. पहिल्या महायुद्धानंतर इंग्लंडचे महत्त्व वाढले दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. तर आता कोरोना सत्राच्या समाप्तीनंतर चीनसह जागतिक पटलावर सर्वोदय होताना दिसत आहे. चीन आणि अमेरिकेमधील महासत्तेचा छुपा संघर्ष आज जग जाहीर आहे म्हणूनच चीनमध्ये कोरोना विषाणूंचा दुष्कृत्याचा खापर अमेरिकेवर फोडण्याची अहमहमिका सुरू झाली आहे. जेणेकरून स्वकियांसमोर स्वतःची प्रतिमा स्वच्छ राहील. आपत्तीजन्य परिस्थितीनंतर लोकांची दबून राहिलेली उपभोग प्रवृत्ती वाढते या वाढीचा संधीत रूपांतर करणारा देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणारा असेल की चीन समजून आहे. एकहाती सत्ता प्रस्थापित करून तहहयात चीनचे राष्ट्राध्यक्ष राहण्याची शी जिनपिंग यांची इच्छा व त्यासाठी बदललेले नियम हिटलरप्रमाणे चीनला आत्मघाताकडे नेणारे पाऊल ठरू नये.
अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास 2020 मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था 21.44. ट्रिलियन इतकी होती. तर चीनची अर्थव्यवस्था 13.37 ट्रिलियन इतकी होती. 2023 पर्यंत चीनने अमेरिकेला मागे टाकून 25.27 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न आखले आहे. आजची जैविक लढाई महासत्तेचे स्वप्न साकार करण्याचा एक भाग आहे. जगातील सगळ्या अर्थव्यवस्थांना कोरोनामुळे व लॉक डाऊनमुळे उद्ध्वस्त होत आहेत तर दुसरीकडे जगाला कोरोनाच्या आपत्तीत ढकलून चीन मात्र रात्रंदिवस उत्पादन करण्यात मग्न आहे. यातूनच चीनचा कुटिल डाव उघड होतो.
या सारीपाटावरील आणखी एक मोहरा आहे तो म्हणजे भारत होय. भारताची सध्याची अर्थव्यवस्था 2.72 ट्रिलियन असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 पर्यंत 5 ट्रिलियन करण्याचे ध्येय आखले आहे. सध्या भारत महासत्तेच्या संघर्ष स्पर्धेत नसला तरी भारतामध्ये भविष्यातील महासत्ता बनण्याची क्षमता आहे. जगाला आध्यात्मिक दिशा देण्याची ताकद आहे भारताने आपसी मतभेद कमी करून योग्य दिशेने अर्थव्यवस्थेची आखणी केल्यास भारत नक्कीच तिसरी आर्थिक सत्ता म्हणून टक्कर देऊ शकतो. म्हणूनच चीन व अमेरिका भारतीय उपखंडात अशांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अमेरिकेची वार्षिक स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP वाढ 2.1% आहे, चीनची 6.6% आहे तर भारताची 4.7% आहे. 1991 ला भारतीय अर्थव्यवस्था डॉ. मनमोहन सिंगांच्या दूरदृष्टीने खुली केली त्याचा परिणाम 2010 च्या दशकात दिसू लागले. कधी नव्हे ते भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग आठ टक्के पर्यंत पोहोचला होता. 2014 नंतर भारताची जगात वेगळी ओळख निर्माण होऊ लागली. भारताचे नेतृत्व स्वीकारण्यास अनेक राष्ट्रे पुढे येऊ लागली आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे कार्यक्रम व नीती राबवण्यात मोदी काहीसे यशस्वी होऊ लागले. इथूनच चीन आणि भारत यांच्यातील शीतयुद्ध संघर्ष सुरू झाला. चीन अनेक वर्षे पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताला नामोहरम करत होते मात्र यातूनही भारतात होणारी प्रगती चीनसाठी डोकेदुखी ठरत होती. 130 कोटी ग्राहकांची बाजारपेठ म्हणून भारताने जगात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली होती. भारतीय बाजारपेठ ही देखील चीन आणि अमेरिकेमधील छुप्या संघर्षाचे मूळ होते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातही विनाकारण भारताची ससेहोलपट झाली. आजही 'खाया पिया कुछ नही गिलास फोडा बारा आना' अशी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती झाली आहे. थ्री इडियट्स चित्रपटात एक संवाद आहे पहिला नंबर मिळविण्यासाठी स्वतःचे मार्क्स वाढवा आणि दुसऱ्यांचे मार्क्स कमी करायला शिका याप्रमाणे चीनने इतर जागतिक अर्थव्यवस्थांना कोरोना लागण दिली आणि स्वतः मात्र महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली. चीनचा हा संपूर्ण अट्टाहास महासत्तेचे बळ स्वतःभोवती निर्माण करण्यासाठीच आहे हे सत्य लवकरच बाहेर येईल. ज्याप्रमाणे अमेरिकेने लादेन आणि हुसैन यांचा संहार करून जगासमोर स्वत:ची दहशतवाद विरोधी अशी प्रतिमा निर्माण केली त्याचप्रमाणे चीन कोरोनाचा संहार करून जागतिक पटलावर स्वतःची मदतगार हिरो अशी ओळख बनवेल यात शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा