Breaking

रविवार, २० जून, २०२१

"शरीर व मनाच्या सशक्तीकरणासाठी योग विद्या एक उच्च कोटीची साधना"




प्रा.इम्रान वजीर मणेर



प्रा.इम्रान वजीर मणेर

समन्वयक, एकलव्य करिअर अकॅडमी, जयसिंगपूर

ई-मेल : imranmaner@gmail.com

संपर्क- ९९२३२९२३४६


       आंतरराष्ट्रीय योग दिन जागतिक स्तरावर मोठ्या आनंदाने व जल्लोषात साजरा केला जातो. डिसेंबर २०१४ मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत या संदर्भातील ठरावाचा मसुदा सादर केला होता. या आराखड्यास १९३ देशांपैकी १७७ सदस्य देशांकडून प्रचंड पाठिंबा मिळाला आणि एक विशेष दिवस म्हणून त्याचा स्वीकार करण्यात आला.  संयुक्त राष्ट्रांनी ११ डिसेंबर २०१४ रोजी घोषणा केली की २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला जाईल. उल्लेखनीय म्हणजे, आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा केला जातो कारण २१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. २१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

        योग हा शब्द मूळचा संस्कृत असून याचा अर्थ 'सामील होणे' किंवा 'एकत्र येणे' असा होतो. बदलत्या काळामध्ये संतुलित जीवनशैली टिकवून ठेवण्यास योग मदत करते. १५ जून, २०१५ रोजी जागतिक स्तरावर पहिला आंतरराष्ट्रीय योग्य दिवस साजरा करण्यात आला होता. या दिवशी आयुष मंत्रालयाने एक कार्यक्रम आयोजित केला होता ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे ८४ राष्ट्रांच्या मान्यवरांची उपस्थिती होती.  राजघाट येथे एकूण ३५,९८५ लोकांनी २१ योग प्रकार प्रदर्शित केले, यामुळे हा जगातील सर्वात मोठा योग वर्ग बनला.

            भारतीय धर्म संस्कृतीमधील 'योग' संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते, असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने केला गेला आहे. काही वर्षांपासून या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे. योग दिनाचे औचित्य साधून ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योगसत्र झाले. स्वतः अबॉट यांनी यावेळी योगासने केली.

         कोविड -१९ साथीच्या आजारामुळे, २०२० मध्ये योग दिनाची थीम होती ‘घरीच योगासन, कुटुंबासह योगासन'.  थीमद्वारे पाठविलेला संदेश असा होता की, या प्रतिकूल काळात योगामुळे आरामशीर आणि तंदुरुस्त राहण्याची आशा मिळेल.  तसेच, आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी यावर्षीची थीम म्हणजे ‘आरोग्यासाठी योग' (Yoga for Well-being)ही आहे. साथीच्या काळातील मानसिक-सामाजिक सेवेला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये योग महत्वाची भूमिका बजावते.  जेव्हा अलगाव आणि कोविड -१९ च्या रूग्णांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो तेव्हा डॉक्टरांनी योग सत्रांचे आयोजन केले कारण यामुळे मानसिक स्थिरता येते.  म्हणूनच, ‘आरोग्यासाठी योग’ ही या वर्षासाठी योग्य थीम आहे कारण ही काळाची गरज असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्यावर लक्ष केंद्रित करते.

      योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात, यावर अभ्यासकांनी आपली मते मांडली आहे. या सर्व शिकवणीचा सार एकच आहे. ते म्हणजे आपल्या जीवनात योग, योगासने, योगसाधना यांचा अवलंब करणे. जागतिक योग दिनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात एकत्रितपणे काही वेळ योगासने करण्यावर भर दिला गेला. मात्र, आताच्या घडीला असलेल्या करोना संकटामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे यंदा घरीच राहून जागतिक योग दिनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या जागतिक योग दिनात सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले जागतिक योग दिनातील योगदान सर्वांपर्यंत पोहोचवू शकता, असे सांगितले जात आहे.योग हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे.

      या कोरोना साथीला हरविण्यासाठी आपण सर्वांनी चला एकमताने निर्णय घेऊन या घरीच राहून योग दिवस साजरा करू व कोरोना महामारीला हरवू.

1 टिप्पणी: