Breaking

मंगळवार, २२ जून, २०२१

"चळवळीतील एक तारा कालवश बापूसाहेब भोसले यांच्या रूपाने तुटला"

 

बापूसाहेब भोसले यांना भावपूर्ण अभिवादन


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९०)


      बापुसाहेब दादोबा भोसले मंगळवार ता. २२ जून २०२१ रोजी वयाच्या ऐंशीव्यावर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कालवश झाले. ते इचलकरंजीतील ज्येष्ठ राजकीय व सामाजिक कार्यकर्ते होते. इचलकरंजी नगरपालीकेचे नगरसेवक  तसेच आरोग्य समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केले होते.उंच ,शिडशिडीत,बोलक व्यक्तिमत्व, पांढरी पायघोळ विजार - शर्ट हा पेहराव आणि सुरुवातीला लुना आणि अलीकडे स्कूटी ही बापूसाहेबांची ओळख होती. समाजवादी प्रबोधिनीच्या  स्थापनेपासून ते प्रबोधिनीच्या कार्यात सक्रिय सहभागी असलेले कार्यकर्ते होते.कालवश शांतारामबापू गरुड यांना ते फार मानत असत.पाच वर्षांपूर्वी बापूसाहेब भोसले यांचा अमृतमहोत्सव प्रबोधिनीच्या इचलकरंजीतील कार्यकर्त्यांनी उत्साहाने साजरा केला होता.गेल्या पंचेचाळीस वर्षात प्रबोधीनीच्या इचलकरंजीत झालेल्या कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक उपस्थिती बापूसाहेब भोसले यांची होती.अगदी मृत्यूपूर्वी दोन दिवस 

 प्रबोधिनीत कार्यकर्त्याच्या चर्चेत दोन तास सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचे असे अचानक जाणे आम्हा सर्वांनाच मोठा धक्का आहे. त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा अंगभूत मिश्कीलपणा होता.त्यामुळे त्यांच्याशी सर्व वयोगटातील कार्यकर्त्यांचे लगेच जमत असे. इतरांची चेष्टा करण्याबरोबरच स्वतःवरही कोट्या करण्याचे उमदेपण त्यांच्याकडे होते. समाजाच्या सर्व स्तरात त्यांचा वावर होता नगरपालिका ते लोकसभा अशा सर्व निवडणुकांचे राजकारण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता.त्यावरील चर्चेत ते अग्रक्रमाने सहभागी होत असत.धर्मांध,परधर्मद्वेषी,भांडवली राजकारणाचा त्यांना तिटकारा होता. भारतीय राज्यघटनेची मूल्ये व नेहरू प्रणित समाजवादी समाजरचनेच्या विचाराचे ते आग्रही होते.बऱ्या आणि वाईट परिस्थितीतही कोणत्याही कार्यकर्त्याने उमेद हरवून ,हताश होऊन चालत नाही हे बापूसाहेबानी फार सहजपणे दाखवून दिले होते.स्वातंत्र्य आंदोलनाचे बाळकडू मिळालेल्या आणि नव भारताची उभारणी होत असताना लहानाचे मोठे होत गेलेल्या राजकारणाचा सजगपणे विचार करणाऱ्या पिढीचे बापूसाहेब भोसले प्रतिनिधी होते. समाजातील विविध घटकांशी,संस्था-संघटनांशी त्यांचा संबंध होता.समाजवादी प्रबोधिनीचे तर ते जुनेजाणते व बिनीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने समाजवादी प्रबोधिनी परिवाराने इचलकरंजीतील एक ज्येष्ठ व आघाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. बापूसाहेब भोसले यांना समाजवादी प्रबोधिनी  परिवाराचे विनम्र अभिवादन!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा