Breaking

बुधवार, ३० जून, २०२१

तांत्रिक कौशल्य, संवाद कौशल्य आणि सादरीकरण या त्रयींची सिव्हील इंजिनीअरिंग रोजगार निर्मितीसाठी नितांत आवश्यकता: इंजिनिअर,शुभम लेवारकर

 


       कोल्हापूर, दिनांक २८: तंत्रज्ञान विभागाअंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत "करियर अपॉर्च्युनिटी इन सिव्हील इंजिनिअरिंग" या विषयावर पाच सत्रांत वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्यापैकी पाचवे सत्र २७ जून ला पार पडले. यामध्ये यापूर्वी संस्थेतून बी.टेक्. पदवी प्राप्त व उत्तम करियर घडवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या सत्रात इंजि. शुभम लेवारकर, सीनियर प्लॅनिंग इंजिनियर L & T कंस्ट्रक्शन यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील उपलब्ध संधींचे विविध मार्ग सांगितले. 

युपीएससी, एमपीएससी, रिसर्च याव्यतिरिक्त खाजगी क्षेत्रातील विविध संधींचे त्यांनी उदाहरणासह स्पष्टीकरण दिले. हाय स्पीड रेल्वे च्या प्रोजेक्टसाठी क्लायंट, इंजिनीयर/कन्सल्टंट आणि कॉन्ट्रॅक्टर तीन पद्धतीने काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. याशिवाय कन्स्ट्रक्शन कंपनीचे विविध विभाग व त्यातील कामकाजाची त्यांनी माहिती दिली. परंतु, अशा मल्टिनॅशनल कंपनीत रुजू होण्याकरिता तांत्रिक कौशल्य अवगत महत्वाचे आहे. त्याची तयारी कॉलेज जीवनातच बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, काँक्रीट टेक्नॉलॉजी, स्ट्रक्चरल मेकॅनिक्स, थेअरी ऑफ स्ट्रक्चर्स, साॅईल मेकॅनिक्स, ट्रांसपोर्टेशन इंजिनिअरिंग, स्टील डिझाईन व आरसीसी डिझाईन, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग ॲन्ड मॅनेजमेंट असे विषय शिकत असतानाच करणे गरजेचे असते. त्याच बरोबर ऑटोकॅड, रेवीट ही सॉफ्टवेअर्स ड्रॉइंगसाठी, स्टॅड-प्रो, ईटॅब्ज यासारखी सॉफ्टवेअर्स डिझाईनसाठी, तर कॅलक्वाॅन, सीसीएस् कॅन्डी, एसएपी, ईआरपी सारखी सॉफ्टवेअर्स एस्टीमेशनसाठी हाताळण्याची कौशल्ये आत्मसात करावी लागतात. तसेच संवादकौशल्य, सादरीकरण, व्यक्तिमत्व विकास, मॅनेजमेंट स्किल्स, टाईम मॅनेजमेंट या बाबींवर देखील लक्ष केंद्रित करावे लागते असे त्यांनी नमूद केले.

सहाय्यक प्राध्यापक डॉ. पी.पी. फडणीस यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सिव्हिल इंजिनिअरिंग समन्वयक, सहाय्यक प्राध्यापक महेश साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक प्राध्यापक एस्.एम्. पटवेगार यांनी सर्वांचे आभार मानले. सदर वेबिनारला सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    स्मार्ट सिटी विकासासाठी डेव्हलपमेंट प्लॅन गरजेचे: इंजिनिअर प्रतिक डोळे

    तत्पूर्वी, पार पडलेल्या चौथ्या सत्रात इंजिनिअर प्रतिक डोळे यांनी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी आणि टाऊन प्लॅनिंग ॲन्ड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट विषयक मार्गदर्शन केले. इंजिनिअर प्रतीक डोळे यांनी बी.टेक्. सिव्हिल इंजिनिअरिंग ही पदवी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी युनिव्हर्सिटी येथून प्राप्त केली. त्यानंतर एम्. टेक्. इन टाऊन ॲन्ड कंट्री प्लॅनिंग हे पदव्युत्तर शिक्षण कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, पुणे येथून पूर्ण केले. सध्या ते टाऊन प्लॅनिंग ऑफिसर म्हणून टाऊन प्लॅनिंग अ‍ॅण्ड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट, सांगली येथे कार्यरत आहेत.

       केंद्रसरकारच्या कार्यालयांमध्ये युपीएससी, एसएससी जेई, आरआरबी जेई यासारख्या स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत रुजू होण्याची संधी प्राप्त होते. तर पब्लिक सेक्टर  युनिटमध्ये गेट (GATE) परीक्षा उत्तीर्ण होऊन भरती होता येते. तसेच राज्य सरकार सेवांमध्ये एमपीएससी परीक्षांमधून संधी उपलब्ध होतात. म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्हाडा यांसारख्या स्थानिक संस्था स्वतःच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना सेवेत रुजू होण्याची संधी देतात. पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, डब्ल्यूसीडी अशा डिपार्टमेंटमध्ये थेट भरती प्रक्रियेद्वारे सेवेत रूजू होता येते. तसेच उच्चशिक्षणासाठी एम.टेक., एम.एस., पीएच.डी. असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी एडीबी, वर्ल्ड बँक, कॉमन-वेल्थ या सारख्या संस्थांतून फेलोशिप मिळू शकते. परंतु, या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी त्यांची प्रक्रिया समजून घेणे, त्यांच्या अभ्यासक्रमानुसार तयारी करणे, जुन्या प्रश्नपत्रिकांचा सोडवण्याचा सराव करणे, वारंवार उजळणी करणे व आत्मविश्वास यांची नितांत गरज आहे.

   शहराची रचना कशी असावी याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरांमध्ये नागरी वसाहत, व्यापारी संकुल, कारखाने, हॉस्पिटल्स, बाग-बगीचे, रस्ते, उड्डाणपूल यांची नियोजनात्मक आखणी गरजेची आहे. यासाठीच शहरांचे डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे आवश्यक असते. भारतामध्ये चंदीगढ हे शहर डेव्हलपमेंट प्लॅन नुसार वसवलेले शहर आहे. अशाच शहरीकरणाची स्मार्ट सिटी डेव्हलपमेन्ट च्या दृष्टीने सध्याच्या काळात गरज आहे. असे डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यासाठी Arc GIS हे सॉफ्टवेअर वापरले जाते. सध्याच्या काळात सरकारकडून सुद्धा सर्वे करणे, डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे, विविध प्रपोजल तयार करणे यासारखी कामे आउटसोर्सिंग पद्धतीने पूर्ण करुन घेतली जातात. त्यामुळे या क्षेत्रात सरकारी व खाजगी अशा दोन्ही पद्धतीने काम करणे शक्य होते. तसेच या डिपार्टमेंटकडून नोकरीत रुजू झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दोन वर्षांची पगारी रजा प्राप्त होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा