Breaking

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

अमुक एका धरणातून इतके टीएमसी , इतके हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग ; अशा बातम्या ऐकलाय ना! मग टीएमसी व क्युसेक म्हणजे नेमके किती ? चला जाणून घेऊ

 

संग्रहित


     अनेकदा आपण बातम्यांमध्ये वाचतो की, अमुक एका धरणातून इतकं क्युसेक पाणी सोडलं, इतक्या टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असा उल्लेख दिसतो. मात्र धरणातून अमूक क्युसेक पाणी सोडलं म्हणजे नक्की किती? एक टीएमसी म्हणजे नक्की किती लीटर पाणी हे अनेकांना ठाऊक नसतं. त्याच पार्श्वभूमीवर धरणातील पाणी पातळी कशी मोजली जाते आणि त्याचा विसर्ग करताना वापरल्या जाणाऱ्या एककांचा समान्य भाषेतील अर्थ काय यावर टाकलेली नजर…


      पाणी हे प्रामुख्याने दोन पद्धतीने मोजलं जातं. पहिला प्रकार म्हणजे वॉटर अ‍ॅट रेस्ट म्हणजेच पाणीसाठा आणि दुसरा प्रकार वॉटर इन मोशन म्हणजेच वाहणारं पाणी. यापैकी पाणीसाठा हा जलस्त्रोतांसंदर्भात वापरलं जातं. ज्यामध्ये पाणी तलाव, विहरी, बोरवेलसारख्या गोष्टींचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे नद्यांना असणारं पाणी. सामान्यपणे जलसाठ्यांमधील पाणी मोजण्यासाठी घनफूट (क्युबिक फूट) हे एकक वापरलं जातं. मात्र मोठ्या प्रमाणातील जलसाठा असेल तर तो मोजण्यासाठी वेगळी एककं वापरली जातात. नद्यांमधून वाहणारे पाणी आणि धरणामधील पाणीसाठी मोजण्यासाठी टीएमसी फूट हे एकक वापरलं जातं.


टीएमसी म्हणजे नक्की किती?


       एक टीएमसी फूट म्हणजे १०० कोटी घनफूट (क्युबिक फूट). इंग्रजीमधील संख्याशास्त्राप्रमाणे मिलियन हा शब्द वापरतात. त्यामुळेच जास्त प्रमाणात पाणी असेल तर त्याला वन थाऊजंड मिलियन क्युबिक फूट असं म्हणतात. यावरुन टीएमसी (Thousand Million Cubic) हे एकक जन्माला आलं. लिटर्समध्ये सांगायचं झालं तर एक टीएमसी फूट म्हणजे २.८३१ x १००,०००,०००,००० लीटर पाणी. सोप्या भाषेत सांगायचं तर २८ कोटी लीटरहून अधिक. 


क्युसेक म्हणजे काय?


      क्युसेकबद्दल बोलायचं झाल्यास हे पाण्याचा प्रवाह किती आहे हे मोजण्याचं एकक आहे. ‘क्युसेक्स’ म्हणजे ‘घनफूट प्रतिसेकंद’ तर ‘क्युमेक्स’ म्हणजे ‘घनमीटर प्रतिसेकंद’. एखाद्या धरणातून किंवा बंधार्‍यावरुन एका सेकंदाला किती घनफूट (क्युबिक फूट) किंवा घनमीटर पाणी वाहतं हे या एककाच्या मदतीने समजतं.  म्हणजेच १० हजार क्युसेक्स वेगाने १ टीएमसी पाणी सोडलं असं म्हटल्यास. एका सेकंदाला १० हजार घनफूट पाणी या हिशोबाने १०० कोटी घनफूट पाणी सोडलं.


महाराष्ट्रातील काही मोठी धरणे


उजनी ११७.२७ टीएमसी

कोयना १०५.२७ टीएमसी

जायकवाडी ७६.६५ टीएमसी (पैठण)

पैंच तोतलाडोह ३५.९० टीएमसी

पूर्ण येलदरी २८.५६ टीएमसी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा