पुणे : तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहात असाल आणि अपार्टमेंट मेन्टेनन्समध्ये खर्चात अन्याय होत आहे, असं वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण घराच्या क्षेत्रफळानुसारच मेंटेनन्स आकारला गेला पाहिजे, असा महत्त्वपूर्ण आदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जेवढा फ्लॅट तेवढाच मेन्टेनन्स, असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे उपनिबंधकांच्या या निर्णयामुळे अपार्टमेंटधारकांना दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त मेन्टेनन्स उकळणाऱ्या सोसायट्यांना आता चाप बसणार आहे. यापुढे अपार्टमेंट धारकांनाही फ्लॅटचं क्षेत्रफळ जेवढं असेल, तेवढंच देखभाल शुल्क आकारावे लागणार आहे.
पुण्यातल्या ट्रेझर पार्क सोसायटीतील काही सदस्यांनी याबाबत पुण्याचे सहकार उपनिबंधक दिग्विजय राठोड यांच्याकडे दाद मागितली होती. फ्लॅट कितीही खोल्यांचा असला आणि क्षेत्रफळ कितीही असलं, तरी समान मेंटेनन्स आकारला जात होता. त्यामुळे नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची तक्रार छोट्या फ्लॅटधारकांची आहे.
आतापर्यंत अपार्टमेंट धारकांना सहकार उपनिबंधकांकडे दाद मागता येत नव्हती. त्यांना थेट कोर्टात जावे लागायचे. मात्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हा त्रास वाचला आहे.
हा आदेश पुण्यातल्या एका सोसायटीसंदर्भात असला, तरी तो राज्यभरात लागू होऊ शकतो, असा दावा हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने केला आहे. त्यामुळे तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहात असाल आणि अनावश्यक मेन्टेनन्स आकारला जात असेल, तर तुम्हीही हे लक्षात आणून द्या आणि या जाचापासून मुक्त व्हा.
चांगला निर्णय आहे
उत्तर द्याहटवा