Breaking

सोमवार, २६ जुलै, २०२१

बालिंगा पंपिंग स्टेशनचे काम आज रात्री पूर्ण होऊन कोल्हापूरकरांना पाणी मिळणार : डॉ.कादंबरी बलकवडे

 


हेमंत कांबळे :  कोल्हापूर शहर प्रतिनिधी


कोल्हापूर - बालिंगा पंपिंग स्टेशनचे काम आज रात्री पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी, सी आणि डी वॉर्डमधील काही भागात उद्या मंगळवारपासून पाणी पुरवठा सुरु करण्यात येईल अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. 

     त्यांनी आज बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनला भेट देऊन कामाची पाहणी केली. कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारे तीनही उपसा केंद्रांना महापूराच्या पाण्याचा विळखा पडल्याने हे पंपिग स्टेशन गेले चार दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसापासून खंडीत झालाय. पुराचे पाणी ओसरु लागल्याने बालिंगा उपसा केंद्रात दोन ते तीन फुट पाणी असतानाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी तातडीने युध्द पातळीवर पंपिंग स्टेशनमधील मोटारी बाहेर काढल्या. गोकूळ शिरगांव एमआयडीसीमध्ये त्या मोटारी हिटींगसाठी पाठविण्यात आल्या होत्या. आज सकाळी पुराचे पाणी उतरल्याने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बालिंगा आणि नागदेवाडी पाणी उपसा केंद्रांना भेट दिली. याठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. या कामकाजाबाबत आवश्यक सूचना केल्या. सायंकाळपर्यंत बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये मोटारी बसविण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत हे काम पुर्ण झाल्यास रात्रीच पाणी उपसा करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी बालिंगा पंपिग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या भागाला पाणी पुरवठा पुर्ववत करण्याचे नियेाजन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. हे पंपिंग स्टेशन सुरु झाल्यास शहरातील ए, बी, सी आणि डी वॉर्ड काही भागात पाणी पुरवठा सुरळीत सुरु होईल. त्याचबरोबर नागदेवाडी इथल्या मोटारी खोलून बाजूला काढण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी रस्त्यावर पाणी असल्याने रस्ता खुला झाल्याबरोबर मोटारी हिटींगसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर या कामालाही गती येणार असल्याचे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा