![]() |
दीपिका कुमारी |
टोकियो : ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारची सकाळ भारतासाठी आनंदाची बातमी घेऊन आली. महिला तिरंदाजीत भारताच्या दीपिकाकुमारीने रशियाच्या खेळाडूचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. अतिशय चुरशीच्या लढतीत दीपिकाने ६-५ असा विजय मिळवला. ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला तिरंदाज ठरली आहे.
किमान कास्य पदक मिळवण्यासाठी दीपिकाला फक्त एका विजयाची तर सुवर्णपदक जिंकण्यासाठी दोन विजयांची गरज आहे. दीपिकाची उपांत्यफेरीतील लढत आज (३० जुलै) साडे आकरा वाजता होणार आहे.
तिरंदाज अतनू दासचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
![]() |
अतनु दास |
भारताचा आघाडीचा तिरंदाज अतनू दास याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत धडाकेबाज कामगिरी करत तिरंदाजीमधील कोरियन वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अतनू दास याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन्होक याला शूट ऑफमध्ये ६-५ ने पराभूत केले. या विजयासह अतनू दास याने पुरुष एकेरीमधील अंतिम १६ खेळाडूंमध्ये म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
बॉक्सर सतीश कुमार उपांत्य पूर्व फेरीत
बॉक्सिंगमध्ये सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीतभारतीय बॉक्सरनी टोकियोमध्ये विजयी आगेकूच कायम राखली आहे. पुरुषांच्या ९१ किलो हेविवेट वजनी गटात भारतीय बॉक्सर सतीश कुमार याने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनवर ४-१ ने विजय मिळवला. टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा भारताचा तो तिसरा बॉक्सर ठरला आहे. याआधी एमसी मेरीकोम आणि पूजा राणी यांनी महिलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता हे बॉक्सर पदकापासून केवळ एक विजय दूर आहेत.
बँडमिंटनपटू पीव्ही सिंधू क्वार्टर फायनलमध्ये
भारतीय बँडमिंटन पटू पीव्ही सिंधूनं टोकिया ऑल्मपिकमध्ये जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. गुरुवारी खेळण्यात आलेल्या राऊंड १६ मध्ये पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टचा २१-१५, २१-१३ नं पराभव केला. बँडमिंटनमध्ये भारताची एकमेव आशा असलेल्या पीव्ही सिंधूने अवघ्या ४१ मिनिटांमध्ये हा सामना जिंकला आहे. आता क्वार्टर फायनलमध्ये सिंधूचा सामना जपानच्या यामागुची आणि दक्षिण कोरियाचा किम गा उन यांच्यात होणाऱ्या विजयी खेळाडूसोबत होणार आहे.
पुरुष हॉकी संघाची विजयी दौड
भारतीय पुरुष हॉकी संघानं अ गटातील सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनावर ३-१ असा दणदणीत विजय मिळवला.
मेरी कोमचे आव्हान संपुष्टात
आजच्या दिवसाच्या दुसऱ्या टप्प्यात भारताला मोठा धक्का बसला. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या मेरीला पराभवाचा धक्का बसला. ३८ वर्षीय मेरी कोमने कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीला कडवी टक्कर दिली, परंतु भारताच्या दिग्गज बॉक्सरचा प्रवास इथेच संपला.
पदकतालिकेत सध्या चीन १५ सुवर्ण, ७ रौप्य आणि ९ कास्य पदकासह पहिल्या तर जपान १५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ६ कास्य पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका १४ सुवर्ण, १४ रौप्य आणि १० कास्य पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारत एका रौप्य पदकासह ४७व्या स्थानावर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा