Breaking

शनिवार, २४ जुलै, २०२१

पाटण तालुक्यातील भुस्खलनात आंबेघर तर्फ मरळी गाव वाहून गेल्याची भीती ; १४ जण बेपत्ता

 


पाटण : मुसळधार पावसाने पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी येथे पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या भुस्खलनात आंबेघर तर्फ मरळी गावच वाहून गेले. अवघ्या १० उंबऱ्याच्या गावात ​चार कुटुंबे गुराढोरासहित वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्या कुटूंबातील १४ जण बेपत्ता आहेत. भूस्खलनाच्या राडोरोड्यात ती गाडली गेली असावीत अशी भिती व्यक्त होत आहे. एनडीआरएफचे पथकही मदतीस पोचू शकले नाही.

     तहसीलदार योगेश टोम्पे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्यासह स्थानिक प्रशसकीय अधिकाऱ्यांची पथकेही गावात पोचू शकली नाहीत.

  आंबेघरला येणाऱ्या दोन्ही मार्गावरील पुल पाण्याखाली गेले होते. दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाटण तालुक्यात हाहाकार माजला आहे. तालुक्‍यातील नऊ ते दहा ठिकाणी भूस्खलनाच्या घटना आहेत. कोयना, मोरणा व ढेबेवाडी विभागातही त्याची नोंद झाली आहे. बऱ्याच ठिकाणी वित्तहानी झाली असली तरी अद्याप त्याची आकडेवारी निश्चित झालेली नाही.

    मोरगिरीच्या डोंगर पायथ्याला आंबेघर तर्फ मरळी येथे दुर्घटना घडली. अवघ्या पंधरा उंबरा असलेले गाव म्हणजे खालचे आंबेघर. संपूर्ण गावच वाहून गेले आहे. गावातील १० पैकी सहा कुटुंबे सुरक्षित स्थळी हलवण्यात स्थानिकांना पातळीवर लोकांना यश आले आहे. पहाटे दोननंतर अंधारात एकच गोंधळ उडाला. भुस्खलनात चार कुटुंबे बेपत्ता आहेत. कोसळलेल्या डोंगर गावात संकट घेऊन आला. त्या डोंगराच्या राडारोड्यात आख्खं गाव गडप झालं त्यामध्ये ही चार कुटुंब त्यांच्या गुराढोरासहीत गाडल्याची भीती तहसिलदार योगेश टोम्पे यांनी व्यक्त केली.

     गावांमध्ये मदत कार्य पोचलेली नाही आंबेघरमधील दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एनडीआरएफ टीम आंबेगाव येथे पाठवली. मात्र तत्पूर्वीच तहसीलदार टोम्पे, गटविकास अधिकारी साळुंखे त्यांचे पथक तेथे पोचले होते. आंबेघर गावाला लागून असलेला डोंगर पूर्ण कोसळून खाली आल्यामुळे गावाच्या अलीकडे तीन किलोमीटरवर राडारोडा पसरला होता. चिखलाचा खच साचला होता. त्यामुळे जेसीबीसह कोणतीच यंत्रणा कोणती तेथे पोहोचू शकली नाही. परिणामी स्थानिक नागरिकांनी एकमेकाला मदत करत सहा कुटुंबांना जीवदान मिळाले.

    त्या कुटुंबातील सदस्य गोकुळ येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. चार कुटुंबातील किमान 14 सदस्य बेपत्ता आहेत. ती सारेच भूस्खलनाच्या राडारोडा खाली गेले असण्याची शक्यता आहे. आंबेघर येथे जाण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग आहेत ते पूल पाण्याखाली गेल्याने गोकुळपासून मोरगिरी व आंबेघरच्या दोन्ही वाड्यांचा संपर्क तुटला. गव्हाणवाडी, कुसरुंड ते मोरगिरी पहिला मार्ग पावसामुळे बंद पडला होता. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन पुढे जात नव्हते. केवळ बोटे वाहनांसाठी रस्ता खुला होता.

   सांगवड, बेलवडे, माणगाव दुसरा मार्ग मोरगिरीपर्यंत जातो. त्याही पुलावरून पाणी गेल्यामुळे बंद होता. त्यामुळे आंबेघरसहित गोकुळ मोरगिरीचा संपर्क तुटला होता. मदत करण्यासाठी पोचलेली यंत्रणा गोकुळ, मोरगिरी परिसरातच अडकून पडली होती. त्यात तहसीलदार गटविकास अधिकारी, पोलिस यांचा समावेश होता. आंबेघरचे चार कुटुंबे शोधण्यासाठी व पुढील मदत कार्य राबवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र त्यातही पावसामुळे अडचणी येत होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा