भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आज श्रीलंकेने भारताचा पराभव केला. आधीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे मालिका आधीच भारताने खिशात घातली असली तर आजच्या सामन्यातील विजयाने श्रीलंकेच्या संघाला पुढील टी-20 मालिकेसाठी अधिक बळ मिळेल. आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 225 धावांपर्यंत मजल मारली होती. हे आव्हान श्रीलंकेच्या संघाने 7 फलंदाजांच्या बदल्यात आणि 48 चेंडू राखून पूर्ण केलं. पावसामुळे आजचा सामना 47-47 षटकांपर्यंत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भारताने दिलेल्या 225 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी सुरुवातीच्या काही षटकांमध्येच सामना आपल्या बाजूने झुकवला होता.
सलामीवीर अविश्का फर्नांडो (76) आणि भानुका राजपक्षा (65) या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी करत श्रीलंकेला सुस्थितीत नेऊन ठेवलं. त्यानंतरच्या फलंदाजांची पडझड झाली खरी, परंतु 7 विकेटच्या बदल्यात लंकेने 226 धावांचं आव्हान पूर्ण केलं. भारताकडून पदार्पण करणाऱ्या फिरकीपटू राहुल चाहरने 3, चेतन साकरीयाने 2, कृष्णप्पा गौथमने 1 आणि हार्दिक पंड्याने 1 बळी मिळवला.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. एक चांगली सुरुवात करताच तिसऱ्या ओव्हरमध्ये कर्णधार शिखर धवन बाद झाला. त्यानंतर भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा संजू सॅमसन फलंदाजीला आला. संजूने (46) सलामीवीर पृथ्वी शॉसोबत (49) मिळून 100 धावांचा टप्पा पूर्ण केला. पण दोघेही वैयक्तीक अर्धशतकापासून काही धावा दूर असताना बाद झाले. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना दीड तास थांबवण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही संघाच्या 3-3 ओव्हर कमी करुन 47 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु भारतीय संघ पूर्ण 47 षटकंदेखील खेळू शकला नाही. पृथ्वी शॉ आणि संजू बाद झाल्यानंतर मधल्या फळीत एकट्या सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त कुठल्याही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही.
दरम्यान, पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने ही मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली आहे. आजच्या विजयासह श्रीलंकेने मालिकेचा शेवट गोड केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा