Breaking

रविवार, ११ जुलै, २०२१

हिंगोली,नांदेड आणि यवतमाळला ४.४ चा रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का


     हिंगोली जिल्ह्यासह नांदेड आणि यवतमाळला भूकंपाचा धक्का बसला. हिंगोली जिल्ह्यातील नांदापूर व कुरुंदा परिसरात हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे धक्के हिंगोली शहरापर्यंत जाणवले. तसेच नांदेड येथेही हा धक्का जाणवला.

    नांदेड येथे झालेल्या भूकंपाची नोंद रिश्टर स्केलवर ४.४ एवढी नोंदली गेली आहे. वसमत औंढा व कळमनुरी या तीन तालुक्‍यांच्या सीमेवर तीन वर्षांपासून भूगर्भातून आवाज येत आहेत. मात्र, रविवारी सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी बसलेला धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता.

    कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, पोत्रा, वारंगा फाटा, दांडेगाव, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव या परिसरात हे धक्के जाणवले.सांडस परिसरातही दोनदा आवाज झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भूगर्भातून मेघगर्जनेसारखा आवाजही आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

    वसमत शहरासह पांगरा शिंदे, कवठा, कुरुंदा, बोराळा, खुदनापूर, किनोळा, बोरगाव भागात भूकंपाचे धक्का जाणवले. याबाबत तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लातूर येथील भूकंप मापक केंद्राशी संपर्क साधला असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा