रुकडी कॉलेजमध्ये भूजल साक्षरता या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन वेबिनार संपन्न
प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
रुकडी : भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाणी गरजेपुरते वापरले तर ते सर्वांना पुरेल मात्र या पाण्याचा वारेमाप वापर केला तर मात्र भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. विश्वातील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे की जिथे पाणी आहे, या पाण्यामुळे पृथ्वीवर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. पाण्याच्या अतिवापरामुळे पृथ्वीवरील पाणी कमी कमी होत आहे पाण्याचा असाच अतिवापर होत गेला तर सजीव सृष्टी नष्ट व्हायला फारसा वेळ लागणार नाही, त्यामुळे मानवाने आता जागे होऊन उपलब्ध पाण्याचा आवश्यक तेवढा वापर करावा तसेच पावसाच्या रूपाने पडणारे पाणी भूगर्भात मुरविण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत ऋषीराज गोसकी यांनी व्यक्त्त केले.
ऋषीराज गोसकी हे राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित केलेल्या " भूजल साक्षरता " या विषयावरील एक दिवसीय ऑनलाइन वेबिनार मध्ये प्रमुख वक्त्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे होते.
स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश मोरे यांनी केले. श्री. गोसकी यांनी स्लाईड शो व व्हिडिओच्या माध्यमातून भूजलाविषयी सविस्तर माहिती दिली. या वेबिनार मध्ये डॉ.योगिता पाटील यांचेही व्याख्यान झाले डॉ. पाटील आपल्या व्याख्यानात म्हणाल्या भारतात जगाच्या सुमारे १७ टक्के लोकसंख्या राहते मात्र जगाच्या केवळ ४ टक्के पिण्यायोग्य व इतर कारणासाठी वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. अनेकांच्या घरातील पाण्याच्या चाव्या गळक्या असून त्यातून कित्येक लिटर पाणी वापरा शिवाय वाया जाते, गळक्या चाव्या वेळीच दुरुस्त करून पाण्याची विनाकारण होणारी नासाडी थांबविली पाहिजे.भूजल पुनर्भरणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे शिवाय भूजल उपसा नियंत्रित करणे आवश्यक आहे. उपलब्ध पाणी वापराचे व्यवस्थापन झाले तर पाणी समस्या जाणवणार नाही.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले, सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज आहे, पण गरजेचे रूपांतर हव्यासामध्ये झाल्यामुळे पाण्याच्या बाबतीत फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. वैज्ञानिक किंवा तांत्रिक ज्ञानाच्या साह्याने पाणी निर्माण करता येत नाही. निसर्ग चक्राद्वारे जो पाऊस पडून पाणी उपलब्ध होते त्याचा वापर जपून केला पाहिजे. आपण आपणाकडे उपलब्ध असलेला पैसा आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्याप्रमाणे जपून वापरतो त्याप्रमाणे भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाण्याचा वापर झाला पाहिजे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगधंदे, शहरीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे मात्र वर्षानुवर्षे जो पाऊस पडतो आहे त्याचे प्रमाण मात्र वाढले नाही म्हणून उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक आवश्यक आहे. ऑनलाईन संपन्न झालेल्या या वेबिनार मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ.शंकर दळवी यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.माधवी सोळांकूरकर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा