सांगली: सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त ठिकाणाला आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट दिली. भेटीदरम्यान सर्व पूर परिस्थिती भागाचा आढावा घेऊन ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्वेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं जागेची उपलब्धता तातडीने तपासा,' अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यानिमित्ताने दिल्या आहेत.
अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी व माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सहकार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळवाडी येथील पूरग्रस्त निवारा केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. पूरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे ? याची त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच भिलवडी गावातील पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भिलवडी व पंचक्रोशी गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांनी समस्या जाणून घेतल्या.
भिलवडी बाजारपेठेची बोटीतून पाहणी, कवलापूर निवारा केंद्राला भेट दिली.भिलवडी येथील बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या बाजारपेठेची अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर मिरज तालुक्यातील कवलापूर येथील नेहरू हायस्कूलमध्ये पूरग्रस्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्रास भेट देवून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.
शहरातील स्टेशन चौक व दामाणी हायस्कूल येथे निवारा केंद्रास भेट देऊन पुराने बाधित झालेल्या सांगली शहरातील स्टेशन चौक परिसराला अजित पवार यांनी भेट दिली. स्टेशन चौक परिसरातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगली शहराला वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजना राबविण्याबाबत चर्चा केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धरणक्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांचे तातडीने स्थलांतरण करून त्यांना सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. या केंद्रामध्ये अन्न, पाणी याची मोफत सोय करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा