कोल्हापूर : कसबा बावडा डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात सोमवारी मध्यरात्री घरगुती वादातून पोलिस हवालदार असलेल्या सुनेने वयोवृद्ध सासूला पेट्रोल किंवा डिझेल टाकून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद जखमी आशालता श्रीपती वराळे (वय ८०, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.
त्यानुसार पोलिसांनी संशयित पोलिस हवालदार संगीता राजेंद्र वराळे (वय ५१, नेमणूक पोलिस मुख्यालय, रा.कसबा बावडा) यांच्यावर गुन्हा नोंदविला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित या कोल्हापूर पोलिस दलात हवालदार म्हणून पोलिस मुख्यालयात नेमणूकीस आहेत. फिर्यादी आशालता या संशयितांच्या सासू आहेत. संशयित संगीता व सासू आशालता याच्यात पुर्वीचा कौटूंबिक व सांसारीक वाद होता. सोमवारी मध्यरात्री पुन्हा हा वाद उफळून आला. त्यात संशयित संगीता यांनी सासू आशालता यांना जीव मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या तोंडावर डिझेल किंवा पेट्रोल टाकून त्यावर पेटलेला कागद टाकून पेटविले. त्यात फिर्यादी सासू आशालता यांच्या तोंडास, मानेस व उजव्या हातापायास गंभीर जखमी केले.
जखमी अवस्थेत सासूस अन्य नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान फिर्याद दिल्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी भेट दिली.
सदर घटना निंदनीय व स्त्री जातीला काळीमा फासणारी आहे त्यामुळे या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून या घटनेबाबत उलटसुलट चर्चा लोकांच्या मध्ये सुरू आहे अशा प्रकारची माहिती प्राप्त झाली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा