Breaking

रविवार, १८ जुलै, २०२१

लोकसंख्येकडे पाहण्याचा सकारात्मक डोळसपणा हवा ; या आधारावरच बलशाली भारताचे स्वप्न पाहता येईल : प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे




प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


रूकडी : राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रूकडी, श्रीमती अ.रा. पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी आणि जयवंत महाविद्यालय इचलकरंजी या तीन महाविद्यालयाच्या संयुक्तपणे 'जागतिक लोकसंख्या दिनाचा' आभासी पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व पाहुणे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे व  अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील उपस्थित होते. 

   मा. प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी या  कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून  प्रास्ताविकात ते म्हणाले की, या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या मध्ये लोकसंख्येची सद्य परिस्थिती वास्तविक माहिती देणे,जनजागृती करणे व गुणवत्तापूर्ण लोकसंख्या बनविण्यासाठी सातत्याने समाज प्रबोधन करणे हा यामागचा हेतू होता. 

    यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे या विषयावर भाष्य करताना म्हणाले, देशातील लोकसंख्या लाभदायक बनवायचे असेल तर देशातील उपलब्ध साधनसंपत्तीचा पर्याप्त वापर करून आर्थिक विकास साधला पाहिजे. मूल जन्माला येताना केवळ पोट घेऊन जन्माला येत नाही तर दोन हात आणि बुद्धीही घेऊन जन्माला येते,  त्यामुळे लोकसंख्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहीजे. तरुणाईच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच कौशल्य विकासाला चालना देणारे शिक्षण दिले पाहिजे.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या तरुणांच्याकडे पाहूनच भारत २०२० साली महासत्ता होईल हे स्वप्न पाहिले होते पण ते सत्यात उतरले नाही याचे कारण म्हणजे तरुणांच्या हाताला काम मिळू शकले नाही. भारताला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिले पाहिजे,  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापूर्वी संबंधित क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य शिक्षण तरुण वर्गाला दिले पाहिजे.डॉ.अर्जुन राजगे आपल्या भाषणात पुढे म्हणाले,आपल्या देशाला जगाच्या केवळ २.४ टक्के भूभाग वाटणीला आला असला तरी आपण देशातील ६० ते ६१ टक्के कृषी योग्य भूभागावरच शेती करतो, त्यामुळे शेती क्षेत्र वाढविले पाहिजे इतर देशाच्या मानाने भारतात पडणारा पाऊस समाधानकारक आहे परंतु उपलब्ध पाण्याच्या केवळ ४०  टक्केच पाणी आपण वापरतो. उर्वरित ६० टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे उपलब्ध भूभागाचा योग्य वापर करणे, पावसाच्या पाण्याचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त शेती क्षेत्र जलसिंचित केले आणि शेतीचा विकास करून कृषीवर आधारित उद्योगधंद्याची वाढ केली तर देशासमोरील बेरोजगारीची समस्या निश्‍चितपणे कमी करता येईल आणि देशाची लोकसंख्या देशासमोरील समस्या न राहता देशाच्या आर्थिक विकासाचे साधन होऊ शकेल.

      अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ.अनिल पाटील म्हणाले, लोकसंख्या वाढीबाबत समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे.भारताचा विचार केला तर भारताची लोकसंख्या अतिरिक्त आहे हे सत्य स्वीकारला तरी देशाचा विकास साधण्यासाठी लोकसंख्या नियंत्रित करणे आवश्यक आहे.

      ऑनलाईन संपन्न झालेल्या या व्याख्यानास तीनही महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व इतर समाज घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       या रचनात्मक कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन डॉ.त्रिशला कदम यांनी अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने मानले. सदर कार्यक्रमाचे मधुर व सूत्रबद्ध सूत्रसंचालन प्रा.नयना पाटील यांनी केले. या व्याख्यानाचे उत्तम नियोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय देसाई, डॉ. त्रिशला कदम व डॉ.शकुंतला पाटील यांनी केले.

     या उत्साही व सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमाचे विद्यार्थी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा