Breaking

रविवार, २५ जुलै, २०२१

पेगॅसेस वर चर्चा आणि काळसेकरांना अभिवादन

 

काळसेकर

विचारवंत व लेखक मा.प्रसाद कुलकर्णी : समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी


इचलकरंजी ता. २५ पेगॅसेस स्पायवेअर चा वापर करून राजकीय विरोधक असलेल्या  नेत्यांची , वस्तुनिष्ठ भूमिका घेणाऱ्या पत्रकारांची, स्वपक्षीय पण स्वतंत्र विचाराच्या नेत्यांची  हेरगिरी करणे हे संसदीय लोकशाहीच्या देशामध्ये घटनाद्रोहच मानावा लागेल.हे प्रकरण म्हणजे विरोधाकांवर केवळ पाळत ठेवणे नाही.तर त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांच्या घरात अवैधरीत्या घुसून केला जाणारा सायबर गुन्हा आहे. हे अतिशय चुकीचे असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली.

ग्रीक पुराणशास्त्रात असलेल्या उडत्या घोड्याचे नाव धारण करणारी कंपनी म्हणून इस्रायली पेगॅसेस स्पायवेअरची  ओळख आहे. ही कंपनी अब्जावधी रुपयांना सरकारना आपले हेरगोरी तंत्र विकते. भारतात यावरून गदारोळ उठला आहे. कारण हे तंत्र वापरून ज्यांच्यावर हेरगिरी केली जाते आहे ती मंडळी देशद्रोही नाहीत.मात्र या तंत्रज्ञानाच्या आधारे व्यक्ती,पक्ष,संस्था,संघटना यांच्या घटनादत्त मूलभूत  हक्कांवरआक्रमण केले जाते हे दिसून येते.यासाठी कोणत्या यंत्रणेने अब्जावधी रुपये खर्च केले? त्यातून काय सिद्ध झाले ?आणि असा अधिकार कोण कोणाला दिला ? कारण कायदेतज्ञांच्या मते, माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असला तरीही सरकार वा कोणतीही यंत्रणा कोणाचा फोन हॅक करू शकत नाही. त्यामुळे हा गंभीर सायबर गुन्हा आहे हे स्पष्ट होते.यावेळी या विषयाची विविध अंगांनी चर्चा करण्यात आली.

प्रारंभी मुसळधार पाऊस आणि महापुराच्या महापत्तीत आपला जीव गमवावा लागलेल्या सर्वाना आदरांजली वाहण्यात आली.तसेच अपरिमित झालेल्या नुकसानाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले. ज्येष्ठ कवी,संपादक, अनुवादकार सतीश काळसेकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रसाद कुलकर्णी म्हणाले,काळसेकर यांच्या निधनाने एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.गेली अनेक वर्षे त्यांच्या अफाट चौफेर वाचनाबद्दल,मनुष्यकेंद्री साहित्य भानाबद्दल आणि कसदार लेखनाबद्दल सर्वाना कमालीचा आदर होता. सतीश काळसेकरांबरोबर अनेक उपक्रमात, संमेलनात, चर्चासत्रात, बैठकीत,लेखनकार्यशाळेत सहभागी होता आले त्या साऱ्या आठवणी आज येत आहेत. त्यांना समाजवादी प्रबोधिनीच्या कामाबद्दल व मासिकासह सुरू असलेल्या सातत्यपूर्ण उपक्रमाबद्दल आस्था,जिव्हाळा होता हे स्पष्ट केले. आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच  त्यांची  "  "पुस्तकांच्या संग्रहाविषयी " ही कविता सादर केली.यावेळी झालेल्या चर्चेत प्रसाद कुलकर्णी,तुकाराम अपराध, पांडुरंग पिसे,राजन मुठाणे, दयानंद लिपारे, महालिंग कोळेकर, सचिन पाटोळे ,मनोहर जोशी, शकील मुल्ला, रामभाऊ ठिकणे,अशोक माने,आनंद जाधव आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा