Breaking

सोमवार, १९ जुलै, २०२१

सतेज पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात बढती मिळण्याची शक्यता

 



कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील (Congress Satej Patil) यांना मंत्रिमंडळात बढती (Thackeray Govt reshuffle ) मिळण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांच्याकडे सध्या गृहराज्य मंत्रिपद आहे. मात्र त्यांना आता काँग्रेसकडून कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली जाऊ शकते. केंद्रातील नरेंद्र मोदी  मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर, इकडे राज्यातही हालचाली सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या पदावर कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

    याचवेळी मंत्रिमंडळ विस्तार होऊन सतेज पाटील यांना कॅबिनेट मंत्री केलं जाऊ शकतं. 

     सध्या काँग्रेसच्या वाट्यात असलेल्या मंत्रिपदांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात केवळ एक मंत्रिपद दिलं आहे. नगर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री आहेत. मात्र नगर जरी पश्चिम महाराष्ट्रात येत असलं तरी त्याचं महसुली क्षेत्र नाशिक विभागात आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने कॅबिनेट मंत्रिपदच दिलेलं नाही.


पश्चिम महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात वगळता दुसरा कॅबिनेट मंत्री नसल्यानं सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सतेज पाटील यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष निवड, गोकुळ निवडणुकीत मिळविलेल्या यशाचे पालकमंत्री सतेज पाटील यांना बक्षीस देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.


कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं


ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार डिसेंबर 2019 मध्ये झाला होता. त्यावेळी विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली होती. त्याआधी मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत.


ठाकरे सरकारमधील काँग्रेसचे मंत्री


बाळासाहेब थोरात – महसूल मंत्री

नितीन राऊत – ऊर्जा मंत्री

अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम मंत्री भोकर (नांदेड)

के सी पाडवी - आदिवासी मंत्री – अक्कलकुवा (नंदुरबार)

विजय वडेट्टीवार - मदत आणि पुनर्वसन मंत्री – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)

अमित देशमुख- वैद्यकीय शिक्षण मंत्री – लातूर शहर (लातूर)

सुनिल केदार - क्रीडा मंत्री, सावनेर (नागपूर)

यशोमती ठाकूर - महिला आणि बालकल्याण मंत्री- तिवसा (अमरावती)

वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण मंत्री – धारावी (मुंबई)

अस्लम शेख - वस्त्रोद्योग, बंदर विकास, मत्स्यपालन मंत्री मालाड पश्चिम (मुंबई)

सतेज पाटील (राज्यमंत्री) - गृहराज्य मंत्री – कोल्हापूर (विधानपरिषद)

डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) - सहकार राज्यमंत्री पलुस कडेगाव (सांगली)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा