Breaking

सोमवार, २६ जुलै, २०२१

ज्ञान व सक्रियता हा गुरू शिष्य नात्याचा धागा : प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

 


प्रा.मनोहर कोरे : सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी


  मिरज : संत साहित्यामध्ये सदगुरू महामानव असे अधोरेखित केले आहे.ज्याच्या ठायी समबुद्धीचा प्रकर्ष झाला आहे त्याला सद्गुरु म्हणावे असे संत सांगतात. आद्य ग्रंथकार मुकुंदराज यांनी 'विवेकसिंधु ' मध्ये लिहिले आहे की, "ब्रम्हादी पिपिलीकांती,सकळे भूतजाती, जेयांच्या चित्तवृत्ती, न धरी विषम भावाते " याचाच अर्थ मानवधर्मात कोणतीही विषमता चुकीची आहे. गुरु आदर्श व प्रमाणतेचे प्रतीक असतात.खरे गुरु  समाजात ज्ञान ,सक्रियता, समानता, निरोगीपणा यांची वैचारिक व सामाजिक पातळीवर प्रस्थापना करण्याचा प्रयत्न करतात. हा संदेश मराठी संतांच्या गुरू-शिष्य परंपरेने दिलेला आहे आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या' कन्या महाविद्यालय ,मिरज ' च्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.' संत परंपरेतील गुरू-शिष्य नाते 'हा व्याख्यानाचा विषय होता . अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.शर्वरी कुलकर्णी होत्या.स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.माधुरी देशमुख यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.दीपाली आग्रे यांनी करून दिला.

    प्रसाद कुलकर्णी म्हणाले, लोखंडाला सोने करण्याची ताकद गुरूच्या ज्ञानदानी परिसात असते.म्हणून तर ' श्रीगुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धारलो गुरुकृपे '  यापासून ' गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयापाशी ,तुका म्हणे ऐसे गुरु ,चरण त्याचे हृदयी धरू" या पर्यंत अनेक अंगांनी गुरुचा आदर संत साहित्यात व्यक्त झाला आहे. इहलोकी जर स्वर्ग निर्माण करायचा असेल तर गुरु प्रज्ञावंत असणे महत्त्वाचे असते. असे गुरु ज्ञान व विद्या मुक्त हस्ते देत असतात.त्यातून शिष्य प्रज्ञावंत होत असतो. केवळ माहितीचा संग्रह म्हणजे ज्ञान नाही. विद्येमुळे व्यक्तीला आत्मभान आले पाहिजे. त्यातून आपल्या विचारांची दिशा ठरवता आली पाहिजे. हे संत साहित्याचे खरे मर्म आहे. म्हणूनच संत चळवळीने सांगितलेला गुरु महिमा आणि गुरू-शिष्य परंपरेचा केलेला जागर आजच्या गूगलकेंद्री आणि परिस्थितीजन्य ऑनलाईन ज्ञानदानी काळातही अत्यंत महत्त्वाचा ठरतो. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या  भाषणामध्ये मराठी संत परंपरेतील  गुरू-शिष्य नात्याचा अनेक उदाहरणे देत विस्तृत पट मांडला. औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने गुरु सतत शिष्याला शिकवत असतो. अंतिमतः प्रत्येक माणूस कायम विद्यार्थीच असतो याचे भान या परंपरेने ठेवले आहे हे स्पष्ट केले.प्रा.तुषार पाटील यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा