Breaking

शनिवार, ३ जुलै, २०२१

"माजी खासदार राजू शेट्टी ईडीच्या कारभारावर नाराज; आपल्या शैलीत दिली प्रतिक्रिया

 


कोल्हापूर - गेली ५ वर्षे ईडी काय झोपली होती काय, असा सवाल करीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकाच्या कंपनीच्या मालमत्तेवर ईडीने टांच आणली. त्यानंतर महाराष्ट्रात विक्री झालेल्या ५५ सहकारी कारखान्यांमधील घोटाळ्याचा विषय ऐरणीवर आला आहे.

    त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीपासून सर्व तपास यंत्रणांवर चौफेर हल्ला चढविला. ते म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांची दौलत लुटून खाल्ली आहे.

      आणि आता जर पडद्यामागे काही हालचाली होऊन चौकशी थांबली तर चौकशी करणाऱ्यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

       राजू शेट्टी म्हणाले की, 'राज्यातील ४२ कारखान्यांच्या विक्रीत घोटाळा झाल्याने त्याची चौकशी करावी म्हणून ५ वर्षांपूर्वी मी ईडी, आयकर विभाग, महाराष्ट्र शासनाचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग या सगळ्यांकडे तक्रार केली होती. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला होता. पण या सगळ्या तपास यंत्रणांनी गेल्या ५ वर्षांमध्ये त्याची दखल घेतली नाही. ५ वर्षांमध्ये त्यावर काहीही केले नाही. नंतर मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेथेही एक दोन सुनावणीनंतर पुढे काहीच झाले नाही. आता मात्र राजकीय सोयीसाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. मग गेली ५ वर्षे ईडीपासून सगळ्या तपास यंत्रणा झोपल्या होत्या का?, असा परखड सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

           सध्याची ईडीची कारवाई राजकारणाने प्रेरित आहे. पण इथून पुढे पडद्यामागे काही हालचाली होऊन जर या घोटाळ्याचा तपास आणि चौकशी थांबविली, तर चौकशी करणाऱ्यांच्या आणि थांबविणाऱ्यांच्या घरांवर मोर्चे काढू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा