Breaking

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

राधानगरी - कोल्हापूर. शेतात टाकला होता बनावट नोटांचा छापखाना; या एका चुकीमुळे सापडले आरोपी.

 

आरोपी


कोल्हापूर : बनावट नोटांची छपाई करून राष्ट्रीयकृत बँकेत भरून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी  जेरबंद केले. उत्तम शिवाजी पोवार (वय २३, रा. पालकरवाडी, कसबा वाळवा, ता. राधानगरी) आणि अनिकेत अनिल हळदकर (वय २४, रा. चंद्रे, ता. राधानगरी) अशी त्या संशयिताची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी येथे उत्तम पवार यांच्या शेतात बनावट नोटा छापण्यात येत होत्या. ते खपवण्याचे काम हळदकर करत होता. चार दिवसापूर्वी हळदकर याने राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दोन हजारांच्या ६७ नोटा जमा केल्या. बँकेतील कॅशियरने त्या नोटा जमा करून घेतल्या. नंतर या नोटा इतर खातेदारास दिल्यानंतर त्याला नोटा घेताना शंका आली. त्यामुळे त्याने कॅशियरला याबाबत माहिती दिली. ६७ नोटांमध्ये सतरा नोटा या एकाच सिरीयल क्रमांकाच्या होत्या. त्यामुळे कॅशियरने तातडीने राजारामपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.

बनावट नोटा बनावट असल्याचे सिद्ध झाल्यानंतर या नोटा कोणी भरल्या याचा शोध पोलिसांनी घेतला. तेव्हा हळदकर यानेच या नोटा बँकेत भरल्याचे स्पष्ट झाले. त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केल्यानंतर पालकरवाडी येथे बनावट नोटा छापण्याची यंत्रसामग्री असल्याचे त्याच्याकडून समजले. पोलिसांनी तातडीने तेथे छापा टाकून बनावट नोटा छपाई यंत्र सामग्री, कागद, प्रिंटर जप्त केला.


ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सिताराम डुबल व दीपिका जोगळे यांनी केली. याप्रकरणी हळदकर आणि पवार या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. एका शेतात अशाप्रकारे वर्षभर बनावट नोटा छापून त्या खपवले जात असल्याचे कळताच राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. वर्षभर हा प्रकार सुरू असल्याने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आल्याची शक्यता आहे. या नोटा शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा