Breaking

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

लोकमान्य टिळक – स्वातंत्र्यलढयाचा पहिला देशीय नेता! लेखक उमेश सूर्यवंशी यांच्या लेखणीतून विशेष लेख

  



लेखक - उमेश सूर्यवंशी
कोल्हापूर.
9922784065



          लोकमान्य बाळ गंगाधर टिळक….भारतीय स्वातंत्र्यलढयाचे पहिले पुढारी. अलिकडच्या काळातील विशेषत: पावणेदोनशे वर्षाचा महाराष्ट्राचा व भारताचाही इतिहास नाट आकलन करुन घ्यायचा असेल तर टिळक जाणून घेणे नितांत गरजेचे असते. त्यांच्या भुमिका जाणून घेतल्याशिवाय आपणाला त्या काळाचे संपूर्ण आकलन हाती लागत नाही.आपल्या 63 वर्षाच्या आयुष्यात टिळकांनी संबंध भारताच्या इतिहासात एवढे मोठे स्थान नक्कीच स्वकतृत्वाने कमावलेले आहे. टिळकांचे प्रखर अनुयायी म्हणून काही महत्वाच्या लोकांची नावे सांगता येतात आणि टिळकांच्या भुमिकेला आव्हान देणारी देखील त्याहून अधिक थोर मंडळी दाखवता येतात. याचे कारणच मुळी टिळक आपल्या हयातीत इतके महत्वाचे स्थान कमावून आहेत की,कोणत्याही प्रश्नात टिळकांची भुमिका काय आहे यावर त्या प्रश्नाचे सार्वजनिक जीवनातील निर्णय ठरत असत.राजकीय जीवनात प्रचंड यशस्वी ठरलेले टिळक सामाजीक बाबतीत मात्र बरेचदा पराभुत होत गेले हे कटु वास्तव आहे. राजकीय बाबतीत जो व्यापकपणा त्यांच्या विचारात आढळतो तो दुर्देवाने सामाजीक बाबतीत फारसा आढळत नाही.याचकरता विशेषत: महाराष्ट़ात टिळकांचे सामाजीकदृष्टया मोठे पतन झाले आणि देशपातळीवर टिळक हे राजकीय यशाचे मोठे भागिदार ठरले.टिळक आणि त्यांच्या भुमिका म्हणून तर सततच्या अभ्यासाचा विषय ठरत असतात. पण या विषयात सारे पूर्वग्रह टाळून टिळकांच्या कार्याचे आकलन गरजेचे आहे.

           लोकमान्य बाळ गंगाधर टिळक …. रत्नागिरी येथे 23 जुलै 1856 रोजी जन्माला आलेले केशव टिळक हेच पुढे बाळ गंगाधर टिळक म्हणून प्रसिध्द् पावले.टिळकांचे पारंपारीक संस्कृत अध्य्यन  घरीच झाले.अल्पावधीतच त्यांची आई मृत्यु पावली.आणि मॅट्रीक होतानाच वडील गेले.तेव्हा त्यांचे वय होते अवघे साळा वर्षे.या वयातच त्यांचा विवाह देखील झाला.विवाहानंतरही टिळक शिकत राहिले. दरम्यानच्या काळात त्यांनी आपली शरीरसंपदा व्यायामाने चांगलीच सुदृढ बनवली.शिकत असतानाच आगरकरांशी परिचय झाला आणि मैत्री देखील जमली.तरुणपणातच देशसेवेचे व्रत उचलण्याचे ठरले.यातूनच डेक्कन सासायटी उभी राहिली आणि फर्ग्युसन कॉलेजची निर्मिती देखील झाली.यात भर टाकत केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरु केले. इंग्रजी वृत्तपत्राची जबाबदारी टिळकांनी उचलली.याच पत्रातून जनजागृती करताना कोल्हापूरच्या दिवाण बर्वे प्रकरणात टिळक व आगरकर यांना शिक्षा झाली .डेक्क्न मध्ये असतानाच टिळक व आगरकर यांच्यात संस्थेतील धोरणाविषयी आणि एका महत्वाच्या विषयावर मतभेद झाले. याचे पर्यवसान टिळक व आगरकर मैत्री दुभंगण्यात झाली.या दोघाच्या विचारकलहाचा पुढे प्रसार होत महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात देखील य वादाचे मोठे स्वरूप झाले. तो वाद होता आधी सामाजीक सुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य हाच. पुढे कालांतराने या दोघांना आपापल्या मार्गाने देशसेवा आरंभली.टिळक हे राजकारणात सक्रिय झाले आणि आगरकरांनी सामाजीक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी आपले आयुष्य  वेचले.टिळक हे व्यासंगी होते एक चांगले संपादक होते तसेचसंस्कृत,गणित व खगोलशास्त्र यामधील अधिकारी व्यक्ती होते.गीतारहस्य् लिहीणारे टिळक आर्क्टिक होम ऑफ वेदाज सारखा अवघड विषय देखील लिहून जातात.टिळकांची पत्रे देखील उपलब्ध  आहेत. टिळक हे एक चतुरस्त्र नेते होते.

       टिळक हे भारतीय राजकारणातील जहाल विचारसरणीचे नेते समजले जातात.जहाल व मवाळ असे दोन गट पडले होते राजकारणात. त्यापैकी मवाळ गटाचे नेते होते गोपाळ कृष्ण गोखले आणि जहाल गटाचे नेते होते टिळक. आजही लाल ,बाल,पाल ही त्रयी प्रसिध्द् आहे.जहाल या शब्दाचा अर्थ हिंसावादी असा केला जातो तो या शब्दाशी न्याय करतोच असे नाही. मवाळ म्हणजे अहिंसावादी आणि जहाल म्हणजे हिंसावादी अशी ढोबळ मांडणी करुन इतिहासाचे आकलन होत नसते. मवाळांचा कार्यक्रम असे निवेदने व चर्चा या माध्यमातून भारतील स्वातंत्र्याचा मार्ग रेखणे तर जहालाचा मार्ग होता थेट जनतेला सामिल करून जनतेच्या उठावातून इंग्रजी सत्ता घालवणे. याचकरता टिळकांनी जे कार्यक्रम दिलेत ते पहायला हवेत.असहयोग,बहिष्कार,स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षण. हे कार्यक्रम काही हिंसा पेरणारे नव्हेत.टिळकांच्या बाबतीत एक मोठी चूक बहूजन समाजातील विचारवंत व कार्यकर्ते करत आले आहेत की त्यांनी टिळकांना सनातनी वर्गाचा नेता मानले आहे.इथे आगरकरांनी सनातनी वर्गाला दिलेला इशारा आठवतो. आगरकर म्हणाले होते की “ सनातन्यांनो टिळकांना आपला नेता समजू नका.टिळक काय आहेत हे आम्ही तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो”. आगरकरांनी दिलेला हा इशारा वेळीच पुरोगामी लोकांनी ओळखायला हवा. सामाजीक बाबतीत टिळकांच्या भुमिका नक्कीच प्रतिगामी होत्या.पण याची काही कारणे देखील आहेत. टिळकांचे असे म्हणणे होते की,देशांच्या धार्मिक बाबतीतील प्रश्नात तिसऱ्या पक्षाची अर्थात इंग्रजांची कोणतीही भुमिका नसावी. याचे कारणच स्पष्ट् होते की टिळक ज्या स्वातंत्र्याच्या प्रवाहाचे नेतृत्व  करत होते त्या ठिकाणी इंग्रज हेच मुख्य शत्रू होते.आणि इंग्रजांची तोडा आणि फोडा नीती त्यांना जवळून ठाऊक होती.याचकरता टिळकांचे सामाजीक मुद्दयावरुन विविध मोठया माणसांशी जे संघर्ष झाले त्यावरुन बहूजन समाजातील बहुतांशी लोकांनी टिळकांवर खलनायकाचा शिक्का मारला आहे.सामाजीक बाबतीत टिळकांची भुमिका भलेही चुकली असेल असे मान्य् केले तरीही त्यांच्या राजकीय कार्याचे मोल कमी होत नसते हे वेळीच ओळखायला हवे.1902 सालचा वेदोक्ताचा लढा जो पुढे काही वर्षे चालला त्यामध्ये असणारी टिळकांची भुमिकाच त्यांच्या संबंध आयुष्यावर रेखाटून ठेवणे हे बरोबर नाही. ज्या शाहू राजांबरोबर टिळकांचा हा लढा झाला ते शाहू महाराज देखील टिळकांची योग्यता जाणून होते.टिळकांच्या अखेरच्या क्षणात त्यांना विश्रांतीसाठी कोल्हापूरी मुक्कामी आणण्याचा शाहूराजांचे धोरण बहूजन समाजाने नीट ध्यानात घ्यायला हवे.ज्या आगरकरांबरोबर टिळकांचे मोठे झगडे झाले ते आगरकर देखील शेवटच्या काळात टिळकांच्या भेटीची आसं ठेवतात यावरुन देखील योग्य तो बोध घ्यावा.टिळकांच्या काही भुमिकेवर नक्कीच प्रश्नचिन्ह् लावता येते पण ते सारे प्रश्न्‍ बहुतांशी सामाजीक विषयासंबंधीचेच असतात. याविषयीचे काही अधिकचे तपशील न मिळवता त्यांना संपुर्ण बाबतीत ‘ देशाचे दुश्मन  ‘ ठरवणे हे टिळकांच्या कार्यावर केलेला अन्याय आहे हे नक्कीच.

       टिळकांना उच्चवर्गाचे प्रतिनिधी ठरवणे सोपे आहे . मग याच टिळकांसाठी भारतातील कामगार वर्ग पहिल्यांदा संपावर जातो याची सांगड कशी बरं घालावी ? टिळकांना ब्राम्हणहितैषी ठरवणे नक्कीच सोपे आहे मग ‘ मी फक्त  चित्पावनांचा नव्हे ‘ असे सांगणाऱ्या टिळकांचे काय करावे ? टिळकांना हिंदुत्ववाद्याचे नेते ठरवणे खुपच सोपे आहे मग मुस्लिमांकरता लखनौ करार करणारे टिळक आणि ‘ पुढील शिवाजी मुस्लीमामधून निपजेल ‘ या टिळकांच्या वाक्याची पोलखोल कशी करावी ? टिळकांना धार्मिक पुनरुज्जीवनाचे नेते ठरवणे आणखी सोपे आहे मात्र कार्ल मार्क्सची ओळख देशाला पहिल्यांदा करुन देणाऱ्या टिळकांचे काय करावे ? आणखी सोपे आहे टिळकांना दंगलींना प्रोत्साहन हन देणारा नंतर ठरवणे पण मग महात्मा गांधीच्या पहिल्या देशीय चरित्राला प्रस्तावना लिहून देणाऱ्या आणि "या माणसाला आपलेसे करुन घ्या "असे आपल्या अनुयायांना सांगणाऱ्या टिळकांचे काय करावे ? सांगण्याचा हेतू इतकाच आहे की,राष्ट्रीयन नेत्याला आपले ध्येय पुढे घेऊन जायचे असेल तर काही गोष्टी मागे टाकाव्या लागतात आणि आपल्या अनूयायांकरता काही गोष्टी कराव्या देखील लागतात. कोणत्याही राष्ट्रीय नेत्याला हे चूकत नसते. याचे कारण आपल्या भारत देशाची विविधता आणि इथल्या नव्याजुन्या संस्कृती आहेत. एकाच धाग्यात या देशाला गुंफतो असे समजणे हा आपला भोंदुपणा ठरेल. सामाजीक बाबतीत नक्कीच टिळक यांना दोष देता येतील. पण याचकारणे त्यांना देशाचे दुश्मन ठरवण्यापर्यंत आपली मजल जाणे हे खूपच वाईट आहे.

               टिळकांचा अभिमान महाराष्ट्राच्या जनतेला अधिक असायला हवा. कारण हा पहिला असा आधुनिक मनुष्य ज्याने देशपातळीवरील नेतृत्व केले. या नेतृवाला विरोध करताना काही जण टिळकांना पेशवाई अपेक्षित होती असे वक्तव्य  करतात.टिळकांना खरेच पेशवाई अपेक्षित होती तर मग टिळकांचेच राजकारण अर्थात नेतृत्वाचा प्रवाह जो महात्मा गांधीनी आपल्या खांद्यावर घेतला त्याचाही उद्देश पेशवाई आणण्याचाच ठरवायचा का ? काही बहाद्दर त्यांच्या राजकारणाला देखील असेच लेबले लावतात ते आपल्या हितसंबंधासाठीच.यामागे जातीय व्देष काम करतो आणि इतिहासाचे हितसंबंधी आकलन काम करते.मात्र सत्य् इतिहासाला आरसा लागत नसतो.टिळक हेच काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष असायला हवेत ही मागणी बंगालच्या मुस्लीमांनी केली होती हे विसरायचे नसते. टिळक हे उच्चवर्णात जन्माला आले आणि दुर्देवाने त्यांना मिळालेल अनुयायी हे अधिकतर उच्चवर्णीयच होते. यामागे ब्राम्हण् –ब्राम्हणेतर वादाची पार्श्वभुमी देखील कारणीभुत होती हे नाकारता येत नाही. टिळकांसारखा मनुष्य जो देशपातळीवर कार्यरत असतो तो अशा वादांमध्ये जास्त काळ अडकत नाही. मात्र त्यांच्या अनुयायांना त्यामध्येच रस असतो.ज्या कालखंडात टिळक कार्यरत होते त्या काळाला एक निश्चित अशी वेगळी बाजू आहे. टिळकांचे लक्ष्य् थेट समोर आहे.आणि ज्या इंग्रजी राजवटीविरोधात टिळक उभे आहेत ती राजवट साम्राज्यवादी आहेच आणि वेगवेगळया हितसंबंधाना जाणीवपूर्वक एकमेकाच्या विरोधात उभे करण्याची त्यांची रीत आहे आणि गरज देखील आहे. हे काम अत्यंत निष्ठेने त्यांनी केले आणि देशीय पातळीवर याचे अनेक बळी आहेत. टिळक हे त्यापैकीच एक आहेत.स्वराज्य् हा माझा जन्मसिध्द् अधिकार आहे असे इंग्रजांना थेट सुनावणारा मनुष्य ..पेशवाईचे संकुचित धारणा बाळगत नसतो.या देशातील पहिला राजद्रोही पेशवाईचे ऋण गात नसतो.या प्रचंड अस्ताव्यस्त देशाचे नेतृत्व  करणे ही काही खायची गोष्टृ नसतेच मुळी.कोणत्याही संकुचित अर्थाने कार्यरत राहून इतक्या काळपर्यंत तुम्हाला लोक स्विकारत नसतात.एका व्यापक अशा ,निर्भेळ ध्येयाचे आपण निष्ठावंत उपासक आहोत याची खात्री जनतेला पटवावी लागते. तरच तुम्हाला लोकमान्यता मिळत असते. टिळकांनी आपल्या उच्चतर् ध्येयाने देशातील जनतेला आपले बनवले सामाजीक बाबतीत टिळकांना अव्हेरता येईलही पण त्यांच्या राजकीय कामाचे विश्लेषण संकुचित भावनेने करणे हे इतिहासाला धरून असणार नाही.टिळकांना विघातक राष्ट्रवादाचे समर्थक ठरवण्यात बहूजन समाजाचे नुकसानच आहे.कारण टिळक ज्या राजकीय प्रवाहाचे  नेतृत्व करत आहेत तो प्रवाहच मुळी विधायक राष्ट़्रवादाचा प्रवाह आहे आणि तो नक्कीच पुरोगामी आहे.


*!! उमेश सूर्यवंशी 9922784065 !!*


( " दृष्टिकोन " या माझ्या आगामी पुस्तकातील लेख..विचारार्थ )

लोकमान्य टिळक यांना...विनम्र अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा