![]() |
संग्रहित |
मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील पोसरे येथे दरडग्रस्तांना देण्यात आलेला मदतीचा धनादेश दुसऱ्याच दिवशी परत घेण्यात आला असून यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राज्य सरकार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर तोफ डागली आहे.
नेमकं काय घडलं ?
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे गावात दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी हे धनादेश तलाठी परत घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. बँक खात्यात पैसे जमा झालेले नसल्याने हे धनादेश परत घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यावरून सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे.
रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील आणि चेक नंतर देणार असे सांगितले असेल तर ते दुर्दैव आहे. म्हणजेच संकटात असलेल्या पूरग्रस्तांची थट्टा पालकमंत्री आणि सरकार करत आहे, असं यातून स्पष्टच दिसत आहे, असे नमूद करत प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर बोट ठेवले. सरकारने पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे जे पॅकेज जाहीर केले आहे त्याचंही असंच केलं जाणार आहे का?, असा खरमरीत सवाल विचारताना पूरग्रस्तांना छोटी रक्कम मिळवण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागत असेल तर सरकार किती संवेदनशील आहे हे यातून दिसते. एकूणच सरकारने पूरग्रस्तांची थट्टा लावली आहे, असे टीकास्त्र दरेकर यांनी सोडले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा