संकलन - योगेश घाडेकर, विशेष प्रतिनिधी
घोरणे ही चांगल्या सुखी झोपेची लक्षणे नसून सामान्य जीवनातील खुप मोठी समस्या आहे. सामान्यतः घोरणाऱ्याला त्याचा हा त्रास जाणवत नसला तरी इतरांना त्याचा त्रास होतो.
घोरणे आणि स्लिप अॅप्नीया यामुळे केवळ शेजारी झोपलेल्या व्यक्तीला नव्हे,तर स्वत:च्या शरीरातदेखील बदल होत असतात. वजन वाढणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे, मधुमेह बळावणे यापासून ते हृदयविकार, पॅरालिसिस आणि झोपेत मृत्यूसारख्या भयंकर घटनांशी यांचा संबंध आहे.
मनुष्य का घोरतो ?
घोरणे हा ध्वनी म्हणजेच कंपनांमुळे (व्हायब्रेशन) तयार होणाऱ्या लहरी आहेत. कुठल्याही नळीमध्ये कंपन (व्हायब्रेशन) झाले म्हणजे ध्वनी निर्माण होतो. खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या नाकाच्या पाठच्या भागापासून ते पडजिभेच्या मागेपर्यंत एक स्नायूंची नळी असते. ज्याला फॅरिंक्स असे म्हणतात. आपला घसा हा त्याचाच एक भाग आहे. ही नळी अस्थींची म्हणजे ताठर नसून स्नायूंची (लवचीक) असते हे लक्षात घेतले पाहिजे.श्वासोच्छवास सुरू असतानाही नळी जेव्हा कंप (व्हायब्रेट) पावते तेव्हा आवाजाचा ऊगम होतो यालाच घोरणे म्हणतात. कुठल्याही कारणाने ही नळी जर अरुंद झाली तर कंपने अधिक वाढतात. म्हणजेच आवाजाची प्रत अथवा पातळी वाढते. साध्या भाषेत घोरणे म्हणजे झोपेत श्वास घेताना श्वसननलिकेत अडथळा झाल्यामुळे मोठा आवाज निर्माण होणे.
घोरण्याची सामान्य लक्षणे -
सामान्यतः आपण घोरतो यावर घोरणाऱ्याचा विश्वास नसतो, कारण झोपेत त्याला काही कळतच नाही,पण पुढील लक्षणे असतील तर तुम्ही नक्कीच घोरत आहात.
# घोरण्यामुळे श्वास रोखला जातो
# दचकून जाग येते, पुन्हा वेगात श्वास सुरु होतो, या क्रियेत श्वसनमार्गावर भार येतो
# झोपेतून उठल्यानंतर चिडचिड, अस्वस्थता, डोकेदुखी सुरु होणे
# जागे झाल्यानंतर घशास वा तोंडास कोरड पडणे.
#लहान मुलांना जेव्हा हा त्रास होतो, तेव्हा मात्र ही लक्षणे वेगळी दिसतात- जसे बिछाना ओला करणे
# झोपेत खूप घाम येणे.
घोरण्याची कारणे-
@ अनियंत्रित वाढलेले वजन
@ झोपण्याची पद्धत
@ आनुवांशिकता
@ महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक दिसते.
@ पुरुषांमध्ये १७ इंचाहून अधिक तर स्त्रियांमध्ये १६ इंचाहून अधिक लठ्ठ असणारी मान
@ अतिधूम्रपान
उपाय -
* झोपण्याची स्थिती बदला, सरळ पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपा.
* वजन कमी करा, स्थुलतेमुळे गळ्याजवळ खूप अधिक फॅट्स जमा होतात.
* रात्री झोपण्यापूर्वी मधासोबत ऑलिव्ह ऑईल घेतल्याने फायदा होतो.
* धूम्रपान आणि मद्यपान टाळणे गरजेचे आहे.
* अतिप्रमाणात घोरत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा