मुंबई : “टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 87.58 मीटर भाला फेकून स्पर्धेतलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. देशाला मैदानी खेळांमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राने आज इतिहास रचला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी नीरजचे अभिनंदन केले आहे.
पवार म्हणाले की, या नीरजने सुवर्णपदकासोबत देशाचा गौरव वाढवला आहे. कोट्यवधी देशवासियांची मनं जिंकली आहेत. त्याच्या कामगिरीनं ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा दुष्काळ आज संपला आहे. देशातील मैदानी खेळांच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे. नीरज चोप्राचं मन:पूर्वक अभिनंदन”.
उपमुख्यमंत्री अजित पवार अभिनंदनपर संदेशात म्टटलं की, नीरज चोप्राने भालाफेकीत जिंकलेल्या सुवर्णपदकानं पदकतालिकेतंच नव्हे तर जागतिक क्रीडाविश्वात भारताचा गौरव वाढला आहे. नीरज चोप्राचं सुवर्णपदक मैदानी खेळांकडे पाहण्याचा देशवासियांचा दृष्टीकोन बदलेल. मैदानी खेळांना लोकप्रियता, वलय मिळवून देईल. भारतीय युवकांना मैदानी खेळांकडे वळण्यासाठी प्रवृत्त करेल. नीरज चौप्राचं सुवर्णपदक त्याच्या सातत्यपूर्ण, कठोर मेहनतीचं यश आहे. नीरज चोप्राचं, त्याच्या सहकाऱ्यांचं, प्रशिक्षक, मार्गदर्शक, चाहत्यांचंही सुवर्णपदकाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी नीरज चोप्राच्या सुवर्ण कामगिरीचं कौतुक करुन अभिनंदन केलं आहे.
भारताचं पहिलं सुवर्ण
भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा याच्या खेळाकडं भारताच्या नजरा लागल्या होत्या. करोडो भारतीयांचं स्वप्न नीरजनं पूर्ण करत टोकियो ऑलम्पिकमधील पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. पहिल्या फेरीत त्याने 87.03 मीटर लांब भाला फेक करत आघाडी मिळवली. नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं, अखेर कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्राने पूर्ण केलं आहे. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं 87.58 मीटर एवढ्या अंतरावर थ्रो फेकला आहे. पहिल्या दोन फेऱ्यांपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं फेकलेल्या थ्रोची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारताचं पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.
नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नवह्ती. सुरुवातीच्या काळात नीरज चोप्रा इतरांप्रमाणं क्रिकेट खेळत होता. नीरज चोप्रानं मार्च 2021 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस पटियाळा येथे 88.07 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता. 2018 मध्ये नीरज चोप्रानं आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यावेळी त्यानं 88.06 मीटर भाला फेकला होता.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून 6 कोटी जाहीर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्रा याचं अभिनंदन केलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनं 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा