Breaking

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

विलिंग्डन महाविद्यालयामध्ये वेबिनारच्या माध्यमातून लोकसंख्या धोरणविषयक विचार मंथन संपन्न ; गुणवत्तापूर्ण लोकसंख्या निर्मितीस प्राधान्य देणे गरजेचे : डॉ.अनिलकुमार वावरे

 

प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे

प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


सांगली : येथे राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन विलिंग्डन महाविद्यालय सांगली,मिरज महाविद्यालय मिरज व जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  केले होते. लोकसंख्या धोरण विषयक जनजागृती,या प्रश्नाचे महत्त्व आणि गांभीर्य विद्यार्थ्यांना समजावे हा उदात्त हेतु नजरेसमोर ठेवून हा राज्यस्तरीय वेबिनार आयोजित केला होता



प्रारंभी मिरज महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.बी.गायकवाड यांनी मान्यवर उपस्थितांचे स्वागत करून ते प्रास्ताविकात म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मध्ये लोकसंख्या विषयक जाणीव जागृती व वैचारिक शिदोरी मिळावी हा या वेबिनारचा हेतु आहे . विलिंग्डन महाविद्यालय सांगलीचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.मनोहर कोरे यांनी प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा परिचय करून या विषयाचे सध्य परिस्थितीत असणारे महत्त्व विशद केले. सुयोग्य परिचयाच्या माध्यमातून त्यांनी वक्त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा उलगडा करून त्याद्वारे उपस्थित असणाऱ्या सर्व घटकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण केले.

      लोकसंख्या धोरण काळाची गरज या विषयाच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे  व सुयेकचे अध्यक्ष छ.शिवाजी कॉलेज साताराचे उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे यांनी या विषयाच्या अनुषंगाने चौफेर मांडणी केली. डॉ.वावरे म्हणाले की,विषयाला स्पर्श करण्याअगोदर लोकसंख्येची जागतिक व राष्ट्रीय  वास्तविकता काय हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे .

भारताची वाढणारी लोकसंख्या व तिचे जागतिक लोकसंख्येतील असणारे प्रमाण चीनच्या अनुषंगाने तुलनात्मक रित्या त्यांनी सविस्तर विशद केले. लोकसंख्येच्या नियंत्रणा बरोबरच लोकसंख्येच्या गुणवत्तेला ही तितकेच महत्त्व देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतामध्ये एकीकडे श्रीमंतांची संख्या वाढत असताना रुंदावत जाणारी विषमतेची दरी हे निश्चितच लोकसंख्येच्या अनुषंगाने चिंताजनक गोष्ट आहे. देशाचे शैक्षणिक धोरण हे लोकसंख्या धोरणाशी सुसंगत असले पाहिजे आजही देशांमध्ये 90 हजार शाळांची नव्याने आवश्यकता आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. उच्च शिक्षणामध्ये असणाऱ्या तरुणांचा अत्यल्प सहभाग ही देशाच्या भविष्याच्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट आहे. देशाला लोकसंख्येच्या लाभांश मिळवायचा असेल तर हे प्रमाण निश्चितच वाढणे अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले. वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स व वर्ल्ड हंगर इंडेक्सच्या अनुषंगाने राज्यकर्त्यांनी व धोरणकर्त्यानी आपल्या नियोजनामध्ये बदल करणे अपेक्षित आहे. भारताची लोकसंख्या ही भारताची ताकद बनवायची झाली तर तिच्या गुणवत्तेमध्ये मोठी गुंतवणूक सरकारला करावीच लागेल. सरकारने मतपेटीवर डोळा न ठेवता राष्ट्रहितासाठी लोकसंख्याविषयक कडक धोरण आखून त्याची अंमलबजावणी करणे नितांत गरजेचे आहे.स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशाला सुयोग्य लोकसंख्या धोरणाची गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.

      या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी असणारे विलिंग्डन महाविद्यालय सांगलीचे कार्यतत्पर प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर अध्यक्षीय भाष्य करताना म्हणाले की, सुयोग्य शैक्षणिक धोरणाची लोकसंख्येला जोड दिली तर उज्वल भारत साकार होईल. एका बाजूला लोकसंख्येचे नियंत्रण व दुसऱ्या बाजूला अस्तित्वातील लोकसंख्येचे गुणात्मक वृद्धी करणे हीच भारताच्या विकासाची सूत्री असेल. वाढणारी लोकसंख्या देशावर भार ठरावयाची नसेल तर प्रत्येकाच्या हाताला काम उपलब्ध करुन देणे ही जबाबदारी सरकारने पेलली पाहिजे. कौशल्य युक्त शिक्षण ,शेती उद्योगाची सांगड ,ग्रामीण शहरी मधील दरी कमी करणे या माध्यमातून लोकसंख्येचे युक्त वितरण करणे सुलभ होईल. विविध महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे  व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी समाजामध्ये या जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतील असे त्यांनी प्रतिपादन केले.

       या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विलिंग्डन महाविद्यालय सांगलीचे भूगोल विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. रत्नदिप जाधव यांनी केले.या कार्यक्रमाचे उत्तम व नेटके सूत्रसंचालन जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रभाकर माने यांनी केले. त्यांनी आपल्या सूत्रसंचालना मधून कार्यक्रमांमध्ये एक वेगळी ऊर्जा व प्रेरणा निर्माण केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मोलाचा सहभाग नोंदविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा