Breaking

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

पैलवान आप्पालाल शेख यांच्या रूपातील महाराष्ट्र केसरी हरपला



प्रा.मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी


सोलापूर - आयुष्याच्या सुरुवातीस अत्यंत जिद्द,चिकाटी व कष्टाच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारली.मात्र आयुष्याच्या शेवटी परवड होत गेली आणि शेवटी दुर्देवी मृत्यू अशी ही शोकांतिका पैलवान आप्पालाल शेख यांची आहे.

  सन 1992 मध्ये महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविणारे, शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आलेले पैलवान आप्पालाल शेख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि एकूणच कुस्ती क्षेत्रात सर्वत्र शोककळा पसरली.

      पैलवान आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामणी गावातील रहिवासी आहेत. त्यांचे बंधू इस्माईल शेख हे देखील पैलवान होते. इस्माईल यांनी कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूर गाठले. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आप्पालाल देखील कोल्हापूरला गेले. तिथे त्यांना देखील कुस्तीची आवड निर्माण झाली.

   1980 साली आप्पालाल यांचे बंधू इस्माईल यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. भावाचा वारसा पुढे नेत पुढे 1992 साली आप्पालाल देखील महाराष्ट्र केसरी झाले. बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील आप्पालाल यांची निवड झाली होती. त्यात त्यांना यश आले नाही. 1991 साली न्यूझीलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आप्पालाल सहभागी झाले होते. आप्पालाल यांचे पुतणे मुन्नालाल शेख यांनी देखील 2002 सालची गदा पटकावली. एकाच परिवारात तीन-तीन महाराष्ट्र केसरी आहेत.

    कोल्हापुरात असताना व्यायाम करताना एका गाडीने आप्पालाल यांना धडक दिली होती. ज्यात त्यांना गंभीर इजा झाली. तेव्हापासून त्यांच्या पाठीमागे आजारपण सुरू झाले. काही महिन्यांपूर्वी आप्पालाल शेख यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

  अशा या कुस्ती क्षेत्रातील मानकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आणि कुस्ती शौकिनांकडून हळहळ व्यक्त केली.त्यांच्या मृत्यूने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा