Breaking

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

खाकी वर्दीतला आपला माणूस : पोलीस निरीक्षक मा.श्री.दत्तात्रय बोरिगिड्डे.

 

मा.दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस निरीक्षक

       शब्दांकन : प्रा.सुनील धनपाल चौगुले

           जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर

                 मो.नं. ८१४९४८८७७८


          आजपर्यंत जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी काम पाहिले. यामध्ये अलिकडील कालावधीत काही अधिकारी येऊन गेले.ज्या त्या वेळी त्यांचे कार्य जयसिंगपूर मधील आणि परिसरातील नागरिकांनी अनुभवले. या सर्वांमध्ये आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवलाआहे, तो म्हणजे सध्या कार्यरत असणारे पोलिस निरीक्षक श्री.दत्तात्रय बोरिगिड्डे होय.ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील जन्म, अत्यंत कष्टाने आपले शिक्षण पूर्ण करून एक सामान्य कुटूंबातील विद्यार्थी ते पोलिस निरीक्षक असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यांनी आतापर्यंत मुंबई, वर्धा, उस्मानाबाद, तुरची अशा विविध ठिकाणी कार्य केले आहे.

कोरोना विषयी जनजागृती करताना

      जयसिंगपूर मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर हायवेवरील अतिक्रमण काढणे, चोरांचा बंदोबस्त, विविध गावातील वाद व मारामाऱ्या असो अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी योग्य वेळेत कारवाई करून अशा गोष्टींना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न केले. महापुराच्या कालावधीत त्यांनी स्वतः दानोळी येथे  पाण्यात उतरून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम केले. तसेच Radiant cash management pvt ltd मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने केलेला साडेसतरा लाख रुपयांच्या चोरीचा बनाव, सांगलीच्या सराफास जयसिंगपूरच्या हद्दीत दीड लाखास लुबाडल्याचे प्रकरण आणि जयसिंगपूर एस.टी.स्टॅन्ड परिसरातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या 20 ते 25 मोबाईल चोरीचे गुन्हे असतील अशा अनेक ठिकाणी साहेबांनी कार्यतत्परता दाखवून प्रत्येक गुन्ह्यातील मुद्देमाल संबंधितास मिळवून देण्यात आला आहे.

कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

          पोलिस ठाण्यातील चोरीचा छडा आठ दिवसात त्यांनी लावला,त्याचबरोबर दानोळीतील खून प्रकरणाचा जलद छडा लावला आणि ‘बेस्ट डिटेक्शन’ या पुरस्कारास ते पात्र ठरले.  दोन चाकी गाड्या चोरीचे प्रकरणही हाताळून त्यातील अनेक गाड्या संबंधित लोकांना मिळवून दिल्या. निपाणीमधून सांगलीकडे जाणार 21 लाख रुपयांचा गुटखा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलिसांनी पकडला आणि जप्त केला.  त्याचबरोबर जयसिंगपूर आणि परिसरातील अनेक ठिकाणी झालेल्या चोऱ्या आणि अशा प्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस आणले. या गुन्ह्यातील मुद्देमाल संबंधित व्यक्तींना परत मिळवुन दिला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे उदगाव बेघरमधील कुटुंबियांना त्यांचे दागिने परत दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांची प्रतिक्रिया पाहून पोलीसांची सर्व टीम भावनिक झाली. अशा गुन्हयातील सहा आरोपींना कोर्टाकडून शिक्षा झाली आणि आज ते आरोपी जेलमध्ये आहेत. 

विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी साधलेलं सामाजिक काम

मागील वर्षांपासून कोरोनाचे हे जे काही युद्ध सुरू आहे, यामध्ये तर उपलब्ध मनुष्यबळ घेऊन जिल्ह्याची सीमा, जयसिंगपूर शहर आणि हद्दीतील बारा गावे अशा सर्वच स्तरावर त्यांनी केलेले कार्य खरंच कौतुकास्पद आहे. तसेच उदगाव पुलानजीक जयसिंगपूर पोलीस मदतकेंद्र स्थापन केल्याने सर्वांचीच चांगली सोय झाली आहे. यापूर्वी येथील परिसर अंधारात असायचा, यामुळे काहीही घडण्याची शक्यता असे. मात्र नूतन पोलीस केंद्रामुळे कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करताना लोकांना याचा आधार मिळाला.यावर्षीही आलेल्या महापुराच्या वेळी सर्वात अगोदर त्यांनी कवठे सार येथील ग्रामस्थांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्याचबरोबर उदगावजवळील बायपास रोड पाण्याखाली गेल्याने तेथे चोवीस तास पहारा ठेवण्याची व्यवस्था केली. तसेच मुख्य मार्गावर पाणी येत असताना तेथील सुरक्षेसाठी स्वतः रोडवरील पुराच्या पाण्यात जाऊन लोकांना सुरक्षा देण्याचे कार्य केले. यामुळे सर्वच स्तरावर त्यांच्या कार्याचे आणि धाडसाचे कौतुक केले गेले. 

गरजू व वंचित घटकांना मदत

           मार्च-2020 पासून ते आजअखेर त्यांची आणि त्यांच्या टीमची धावपळ सुरूच आहे.असे हे त्यांचे कार्य पाहून येथील प्रसारमाध्यमांकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हे सर्व कार्य करत असताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्यातील माणुसकीचे दर्शन दाखविले आहे.कधीही अरेरावी नाही की जबरदस्ती नाही, अगदी सामन्य व्यक्ती जरी असली तरी त्याची काय समस्या आहे हे ते स्वतः जाणून घेऊन त्यावर योग्य तो उपाय त्यांच्याकडून केला जातो. हे सर्व कार्य करीत असताना आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन अगदी सहजपणे कामे पार पडली जातात.त्यामुळे सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे.याचाच परिपाक म्हणून मा.डॉ.नीता माने नगराध्यक्ष, जयसिंगपूर नगरपरिषद यांच्याकडून बोरिगिड्डे साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सामाजिक उपक्रमातही त्यांचा नेहमी सहभाग असतो.कोरोना महामारीच्या या दुसऱ्या लाटेमध्ये साहेब स्वतः विविध झोपडपट्टी परिसरात 95 – मास्क तसेच धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना दिसत आहेत.कामाचा एवढा व्याप असतानाही गोरगरिबांना गरजेच्या गोष्टी देऊन त्यांचे प्रबोधन केले जात आहे हे अत्यंत अभिमानास्पद व पुढील पिढीला आदर्शवत आहे. आई वृद्धाश्रम असो, महापुरातील विस्थापित असोत की अन्य कोणीही गरजू असो, अगदी कॉलेजमधील विद्यार्थी असोत अशा सर्व स्तरावर साहेबांनी मदतीचा हात नेहमी पुढे केलेला आहे. हे सर्व काम करत असताना नेहमीच प्रसिद्धीपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले आहे. त्यामुळे मला खाकी वर्दीतील त्यांच्यातील माणूस आणि माणुसकीचे दर्शन त्यांच्या या कार्यातून नेहमी होत असते. या सर्व सामाजिक व मानवी संवेदनशील भावनेला स्पर्श करणाऱ्या या खाकी वर्दीतील आपल्या माणसाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्याची जाहिरात कधी ही केली नाही एक गोष्ट देखील विचारप्रवण करणारी आहे.

झोपडपट्टी वासियांना मास्क वाटप करून त्यांचे प्रबोधन 

       अशा कर्तृत्ववान  अधिकाऱ्याच्या कार्यास माझा सलाम  व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा