Breaking

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

मानवी जीवन समृद्ध करावयाचे असेल तर मानवाने नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर शहाणपणाने करण्याची गरज : कुलगुरू,डॉ.डी.टी.शिर्के

 




मालोजीराव माने : कार्यकारी संपादक

'रुकडी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय ई- कॉन्फरन्स ऑनलाइन पद्धतीने संपन्न'


रुकडी : आपण निसर्गातील विविध साधन संपत्तीचे शोषण करीत आहोत. त्यामुळे मानवी जीवन संकटात सापडले आहे त्यातून मानवाला वाचवायचे असेल तर मानवाने नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर शहाणपणाने करायला पाहिजे, आपण वेगवेगळे प्रयोग करून कमीत कमी नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करायला पाहिजे. पारंपरिक शक्त्ती साधनांचा वापर कमी करून  पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यासारख्या पर्यावरण पूरक ऊर्जा साधनांचा वापर करणे गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमावर भर दिलेला असून विविध कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय,ज्योती किरण पब्लिकेशन पुणे आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवसीय नैसर्गिक संसाधने व चिरस्थायी विकास या विषयावरील आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उद्घाटक म्हणून बोलत होते.


     डॉ. माधवी सोळांकुरकर यांनी कॉन्फरन्समध्ये सहभागी असणाऱ्या मान्यवर व सर्व प्राध्यापक, विद्यार्थी वर्गाचं मनस्वी स्वागत करून प्रास्ताविक करताना त्या म्हणाल्या की, आज आंतरविद्याशाखीय विषयाला महत्त्व असून या माध्यमातून विविध घटकांना एकत्रित करून विविध विषयावर सांगोपांग चर्चा होणे गरजेचे आहे हा या कॉन्फरन्सचा हेतू आहे. तसेच त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय उत्तम पद्धतीने मांडल्या यामुळे या कॉन्फरन्समध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

  बीजभाषणामध्ये श्रीलंका येथील केलानिया विद्यापीठातील डॉ. लाल मर्विन धर्मासिरी यांनी शाश्वत विकासासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरामध्ये स्वदेशी ज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी श्रीलंकेतील पारंपरिक भात शेतीचे वर्णन करून मृदा या साधनसंपत्तीचा शाश्वत विकास कसा करता येईल या विषयावर सविस्तर माहिती दिली. 

      अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विभागातील प्रा.डॉ. पी.एस. कांबळे म्हणाले, नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत विकास करावयाचा असेल तर आपण आपल्या परिस्थितीला अनुसरून संसाधनाचा वापर केला पाहिजे संसाधनाच्या शाश्वत विकासासाठी नैसर्गिक संसाधने वापराबाबत धोरण ठरवणे आवश्यक आहे. या परिषदेमध्ये अमेरिकेतील सॅलसबरी विद्यापीठातील व्हीजिटिंग प्रोफेसर डॉ. प्रवीण सप्तर्षी यांचे नैसर्गिक संसाधनाचा सर्वसमावेशक विकास या विषयावर तर संसाधनाचे शाश्वत मूल्य या विषयावर शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विभागाचे माजी सेवानिवृत्त प्रमुख प्रा.डॉ.वसंत जुगळे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ भूगोल विभाग प्रमुख व भूगोल अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. संभाजी शिंदे होते. 

          ऑनलाईन संपन्न झालेल्या या परिषदेमध्ये भारतातील विविध राज्यासह इतर देशातील सुमारे २२५ संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी  सहभागी झाले होते. तसेच २०४ सहभागी प्रतिनिधींनी आपले शोधनिबंध परिषदेमध्ये सादर केले. हे सर्व संशोधनपर लेख ज्योतीकिरण पब्लिकेशन पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार आहेत.परिषदेचा समारोप रो.अशोक जैन इचलकरंजी यांच्या अध्यक्षतेखाली तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील हरी सहाय पदवीव्युत्तर कॉलेजच्या प्रा. एकता केशरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा माजी खास. डॉ. निवेदिता माने, सचिव खास. श्री. धैर्यशील माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय देसाई, डॉ. अशोक पाटील,श्री अमर बुल्ले, डाॕ.उत्तम पाटील डॉ. खंडेराव शिंदे डॉ. शर्मीला साबळे डॉ. हिंदुराव संकपाळ तसेच महाविद्यालयातील इतर सर्व शिक्षक, प्रशासकीय सेवक यांनी परिषद आयोजनासाठी प्रयत्न केले. दिवसभर चाललेल्या या परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. माधवी सोळांकुरकर यांनी केले.

       रुकडी कॉलेजच्या या अत्यंत जोशपूर्ण व समाजोपयोगी आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन करून समाजातील सर्व घटकांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करून दिली व या विषयाच्या अनुषंगाने वैचारिक मंथन करण्यात आले. यामुळे या परिषदेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. या या परिषदेच्या आयोजकांचे सर्व घटकांतून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा