*प्रा.डॉ.महावीर बुरसे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मधील नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघटनेमार्फत मान्यवरांचा व गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री.डी.एस.बोरिगिड्डे हे होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी विक्रांत माळी याच्या सुरेल आवाजात देशभक्तीपर गीताने झाली.
माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.प्रभाकर माने यांनी कार्यक्रमातील उपस्थित मान्यवर व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना म्हणाले, माजी विद्यार्थी संघटना माजी विद्यार्थी, प्राध्यापक व समाज कार्यासाठी कटीबद्ध असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवंगत प्राध्यापकांच्या नावे पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रा.सुनील चौगुले यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करीत व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडले यामुळे उपस्थितांच्या मध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्मिती झाली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक बोरिगिड्डे म्हणाले,माजी विद्यार्थ्यांनी संघटनेमध्ये मित्र म्हणून कार्य करावे जेणेकरून आजच्या धकाधकीच्या जीवनात जे प्रश्न निर्माण होतात, त्याच्यावर मित्र हा एक रामबाण उपाय होऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या विषयांमध्ये करिअरच्या संधी शोधाव्यात जेणेकरून त्या क्षेत्रात उच्च पदावर मार्गस्थ होऊ शकतो.
स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य खूप मोठे असून आपण सुरू केलेल्या कार्यास उत्तरोत्तर प्रगती व सामाजिक जाणीव निर्माण करणारी आहे असे गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रभारी प्राचार्य डॉ.सुरत मांजरे प्रकृती स्वास्थ्यामुळे अनुपस्थित राहिले त्यांच्याऐवजी प्र.प्राचार्य म्हणून डॉ.सौ.मनीषा काळे उपस्थित होत्या. त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी औरवाडचे सुपुत्र पृथ्वी प्रताप गावडे यांची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.रोहित दिनकर चव्हाण यांनी दक्षिण कोरिया देशातील रसायनशास्त्र विषयातील पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कनिष्ठ महाविद्यालयातील कालवश प्राध्यापक आर.आर.पाटील,आर.डी. धुमाळ, व्ही.पी.भवरे यांच्या स्मरणार्थ अनुक्रमे जीवशास्त्र,इंग्रजी व मराठी विषयात एच.एस.सी बोर्ड परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आलेल्या कु. अमृता देसाई, कु. साक्षी खातेदार, आदित्य क्वाणे, किशोर वाघमोडे, कु. सृष्टी आवटी यांचे सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ.ए.ए. पुजारी होते. त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रगतीचा धावता आढावा मांडला व संघटना यापुढेही समाज उपयोगी कार्य करेल या निमित्ताने त्यांनी आश्वासित केले.
या कार्यक्रमाचे आभार संघटनेचे सदस्य अरुण कांबळे यांनी मानले तर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.बी.ए.पाटील यांनी केले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक संजीव मगदूम,माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य प्रा.पी.सी.पाटील, सुनील कोळी ,पर्यवेक्षक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, माजी विद्यार्थी, पालक, प्रशासकीय कर्मचारी व पत्रकार व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करून हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा