हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी येथे लावलेले तपासणी नाके ताबडतोब हटवण्यास कर्नाटक सरकारला सांगावे; अन्यथा उद्या, गुरुवारी शिवसैनिक ते उखडून टाकतील, असे इशारापत्र जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मंगळवारी देण्यात आले.
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांना आरटीपीसीआरची सक्ती थांबवली नाही, तर महाराष्ट्रातही कर्नाटकच्या वाहनांना प्रवेश देऊ नये, अशीही मागणीही करण्यात आली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कर्नाटक सरकारकडून महामार्गावर होत असलेल्या अरेरावीची वस्तुस्थिती मांडली. कर्नाटक सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कोगनोळी नाक्यावर आणि आता दूधगंगा नदीवर तपासणी नाके बसवले आहेत.
आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असेल तरच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना पुढे सोडले जात आहे. महाराष्ट्रात जात असणाऱ्या वाहनांचीही अडवणूक केली जात आहे. तपासणी वाढवल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. पण, नागरिकांवर दबाव टाकण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तेथे तैनात केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा