![]() |
जयसिंगपूर-चिपरी रस्त्याची झालेली चाळण |
प्रा.मेहबूब मुजावर : जैनापुर प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचं गाव म्हणून चिपरी गावाकडे पाहिले जाते.मात्र जयसिंगपूर लगत असणाऱ्या या गावातील रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. चिपरी गावातून जयसिंगपूरकडे जाण्यासाठी अस्तित्वात असणारा जिल्हा मार्ग हा एकमेव मार्ग असून सध्या या मार्गाची अवस्था हि अत्यंत दयनीय झालेली आहे. या रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांचे अत्यंत हाल होत आहे. चिपरी गावामध्ये गंभीर रुग्णाला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी जयसिंगपूरला पाठवणे गरजेचे असेल तर सदर रस्त्याची जी दुरावस्था आहे त्यामुळे संबंधित नागरिकाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो इतकी वाईट अवस्था सदर रस्त्याची झालेली आहे.
सर्व पातळीवर कार्यरत असणारे लोकप्रतिनिधी सुद्धा चिपरी गावात येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात मात्र कुणालाही सदरचा रास्ता दुरुस्तीचा विचार सुचत नाही किंवा जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केले जाते अशी शंकाही मनात निर्माण झाली आहे.
सदर रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक विविध कामासाठी या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. याचबरोबर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना याच रस्त्यावरून ये जा करावी लागते याशिवाय दुसरा पर्याय नाही.
त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण तात्काळ करणे अत्यावश्यक आहे सदर रास्ता दुरुस्तीसाठीचा प्रशासकीय पातळीवरील प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असून सदर प्रस्तावास तात्काळ मान्यता मिळावी अन्यथा २ ऑकटोबर गांधीजयंती दिवशी चिपरी बस स्टॅन्ड चौकामध्ये आमरण उपोषणास सुरवात करणार असल्याचे लेखी निवेदन आम आदमी पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय परिषद सदस्य विलास रजपूत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना दिलेले आहे.
तसेच उपोषणाच्या अनुषंगाने उदबवणाऱ्या परिस्थितीस जिल्हा परिषद प्रशासन तसेच रस्त्याच्या कामाबाबत संबंधित विभाग जबाबदार असेल असेही विलास रजपूत यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तरी संबंधित प्रशासनाने व लोक प्रतिनिधीनी गंभीरपणे यामध्ये लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करून लोकांची सोय करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा