![]() |
प्रा.डॉ.चंद्रकांत लंगरे, शिवाजी विद्यापीठ |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर: व्हर्जिनिया (अमेरिका) येथील जेम्स मॅडिसन विद्यापीठातील दिवंगत प्रा. टेरी बेट्झल आणि येथील शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातील प्रा. चंद्रकांत लंगरे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन व कार्याविषयी संपादित केलेल्या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथांचे प्रकाशन येत्या शुक्रवारी (दि. १ ऑक्टोबर), गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ऑनलाईन स्वरुपात करण्यात येणार आहे. अमेरिकेतील प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजता तर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होईल. इंग्लंड पार्लमेंटमधील मजूर पक्षाचे सदस्य ज्येष्ठ विचारवंत प्रा. लॉर्ड भिकू पारेख आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती असेल.
प्रा. टेरी बेट्झल आणि डॉ.चंद्रकांत लंगरे यांच्या संदर्भग्रंथ
प्रा. बेट्झल आणि प्रा.लंगरे यांनी ‘रिफ्लेक्शन्स ऑन महात्मा गांधी: द ग्लोबल परस्पेक्टीव्ह’ आणि ‘रिथिंकिंग महात्मा गांधी: द ग्लोबल अप्रायझल’ हे दोन संदर्भग्रंथ संपादित केले आहेत. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन यांचे औचित्य साधून जेम्स मॅडिसन विद्यापीठाचे महात्मा गांधी सेंटर आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी प्रा.पारेख आणि श्री. गांधी यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, जेम्स मॅडिसन विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. हीथर कोल्टमन, मॅडिसन विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड लेटर्सचे अधिष्ठाता डॉ. रॉबर्ट ऑग्युरे, महात्मा गांधी सेंटरच्या संचालक डॉ. टैमी कासल उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://linktr.ee/gandhicenterjmu या लिंकवर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे, असे डॉ. कासल यांनी कळविले आहे.
दिवंगत प्रा. टेरी बेट्झल आणि प्रा. चंद्रकांत लंगरे यांनी ‘इंडो-अमेरिकन बुक प्रोजेक्ट २०१९’अंतर्गत महात्मा गांधी यांच्याविषयीच्या ग्रंथांचा प्रकल्प हाती घेतला. त्यातून ‘रिफ्लेक्शन्स ऑन महात्मा गांधी: द ग्लोबल परस्पेक्टीव्ह’ आणि ‘रिथिंकिंग महात्मा गांधी: द ग्लोबल अप्रायझल’ हे दोन संदर्भग्रंथ साकार झाले आहेत. दोन्ही ग्रंथांत मिळून जगभरातील एकूण ६१ गांधी अभ्यासक-संशोधकांनी महात्मा गांधींच्या विविध पैलूंवर संशोधनपर लेख लिहीले आहेत. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, इटली, जर्मनी, जपान आणि भारतातील गांधी विचारवंत व संशोधकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ग्रंथांसाठी जागतिक ख्यातीचे गांधी तत्त्वज्ञ आणि राजकीय विचारवंत, भाषाशास्त्रज्ञ, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये प्रदीर्घ काळापासून मजूर पक्षाचे सदस्य, लंडन स्कूल ऑप इकॉनॉमिक्स, वेस्टमिन्स्टर विद्यापीठाचे प्राध्यापक आणि ब्रिटीश अॅकॅडमीचे सदस्य लॉर्ड भिकू पारेख यांची प्रस्तावना लाभली आहे. तर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, लेखक तुषार गांधी यांचा अभिप्राय लाभला आहे.
शिवाजी विद्यापीठातील इंग्रजी विषयाचे प्रा.डॉ.चंद्रकांत लंगरे एक सामाजिक बांधिलकी जपणारे व संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखले जातात. सामाजिक चळवळीच्या उत्थानासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात.
डॉ. लंगरे यांनी महात्मा गांधींच्याविषयी संपादन केलेले दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संदर्भग्रंथांची निर्मिती केली आहे. खरंच सर्व भारतीयांना सार्थ अभिमान वाटावा अशी अभिनंदनीय व कौतुकास्पद कामगिरी त्यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा