Breaking

सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

आयुष्याचा जमाखर्च व आनंदमय जीवनाचा खरा मार्ग : सिने अभिनेता नाना पाटेकर

 

सौजन्य : amarujala. com


 आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्याबरोबर नेता येणार नाही. मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे. ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टीही केल्या पाहिजेत. शक्य असेल तेवढा दानधर्मही करायला हवा. मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी संपत्ती गोळा करून साठवून ठेवायची काही गरज नाही. तसे केले तर पुढची काही वर्षे स्वतः काहीही न करता ते नुसते बसून खातील आणि आपल्या मृत्यूची वाट बघतील.

       आपण गेल्यानंतर काय होणार याची चिंता करु नका. कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल, तुमच्या मुलांची खूप काळजी करु नका. त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या; स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या इच्छा आकांक्षांचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका, मुलांवर प्रेम करा. त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तूही द्या. मात्र काही खर्च स्वत:वर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा. जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा. तुम्ही कदाचित आपल्या चाळीशीत असाल, पन्नाशीत किंवा साठीत, आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमावण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजण्यासाठी चांगले आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. कमावणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल ? तुमच्याकडे शेकडो किंवा हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते. तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते.

     एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस कमावला आहात हे लक्षात असू द्या. आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल, तर तुम्ही आजारातून बरे व्हाल. तुमचा स्वभाव आनंदी असेल तर आजागतन लवकर बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आजूबाजूला जे जे उत्तम आहे; उदात्त आहे त्याकडे पाहा. त्याची जपणूक करा आणि हो ! तुमच्या मित्रांना कधीही विसरू नका.. त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने तरुण रहाल आणि इतरांना हवेहवेसे वाटाल...मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल.

      हे फक्त लिहिण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नसून प्रत्यक्षात अमलात आणावे जेणेकरून तुमचं आयुष्य आनंदमय होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा