Breaking

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

*पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केलेल्या संकल्पाप्रमाणे आई वृध्दाश्रमातील वृद्धेचा वाढदिवस उत्साहात केला साजरा*


पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के 


रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रतिनिधी


           जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा.राजेंद्र मस्के यांनी बोलून दाखवलेल्या संकल्प प्रमाणे आज आई वृध्दाश्रमातील सर्वात वयोवृद्ध शिला आजींचा वाढदिवस वृध्दाश्रमात जाऊन उत्साहात साजरा केला.

    याअगोदरच पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी आई वृध्दाश्रमातील अनाथ व निराधार वृध्दांचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचा संकल्प केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी आई वृध्दाश्रमातील वृध्दांच्या जन्म तारखेंची  माहिती घेतली असतांना एक शंभरी पार केलेली आजी शेवटची घटका मोजत असल्याचे पण तिची जन्म तारीख माहित नसल्याचे मस्के यांना वृध्दाश्रमाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी सांगितले. त्याप्रमाणे आपल्या उपक्रमाची सुरुवात तिच्याच वाढ दिवसानी करावी अशी विनंती केली. आणि या विनंतीला मान देऊन मस्के यांनी लगेचच वेळ न दवडता याच आजींचा वाढ दिवस साजरा करण्याचे ठरविले.

       आई वृध्दाश्रमात शिला आजींच्या वाढदिवसाची जय्यत तयारी आणि  लगबग सुरू झाली. वृध्दाश्रमात सजावट करण्यात आली. बर्थडे बॅनर लावण्यात आले. पताका आणि फुग्यांची आरास करण्यात आली. शिला आजींना साडी नेसता येत नसल्याने त्यांना नवीन गाऊन आणला होता. बिगर क्रीमचा केक आणला होता. मेणबत्त्या आणि फुलांच्या पाकळ्यांनी केकची सजावट केली होती. शिला आजींसह सर्वच आज्यांना वाढ दिवसाच्या टोप्या  आणल्या होत्या. त्या  घालून अगदी लहान मुलांप्रमाणे आज्या अगदी आनंदाने मिरवत होत्या .  

           सायंकाळी 6.30 वाजता पोलिस निरीक्षक मस्के आपल्या मोजक्या स्टाफसह आई वृध्दाश्रमात दाखल झाले. त्यांनी शिला आजींच्या थरथरत्या हाताला धरून केक कापला , आपल्या हातांनी त्यांना केक भरविला यावेळी शिला आजींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यानी वृध्दाश्रमात मला आसरा देऊन माझ्या मुलाने आणि त्यांच्या कुंटूंबाने खूप सेवा केली आहे. मी आता मरायला मोकळी झाले. पण.. माझ्या मुलाला साथ द्या. त्याला मदत करा. त्याच्या पाठीशी रहा असे भावनिक आवाहन केले. 

     यावेळी वातावरण अगदीच धीरगंभीर झाले. यावेळी पोलीस निरीक्षक मस्के यांनी आई वृध्दाश्रमाच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे अभिवचन शिला आजींना दिले.आई वृध्दाश्रमातील या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला.सामाजिक जाणिवेची आणि आपले पणाची भावना निर्माण झाली. आणि खाकी वर्दीतला देव माणुस आई वृध्दाश्रमाने अनुभवला.

     यावेळी आई वृद्धाश्रमाचे विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि जेष्ठ पत्रकार दगडु माने यांनी आपल्या मनोगतात मस्के यांच्या कल्पनेचे आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी पत्रकार राहुल पोवार , शौकत मिस्री , वैभव माने , हिरकणी न्युजचे संपादक गणेश वाईकर , उपसंपादक इक्बाल इनामदार आणि महिला पोलिस कर्मचारी आणि पोलिस उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.

     या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची चर्चा मात्र सर्वत्र आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा