![]() |
मा. मुख्याध्यापक श्रीशैल मठपती, महापूर आपत्ती अभ्यासक |
प्रा.मनोहर कोरे : उपसंपादक
शिरोळ तालुका महापूर आपत्ती या संदर्भात विचारमंथन होत असताना पूर्वी आलेल्या महापुराचा साधक-बाधक विचार करणे योग्य ठरते. त्यामुळे सन 2005, 2006, 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापूरला कृष्णा पाणलोट क्षेत्रात झालेली अतिवृष्टी हेच प्रमुख कारण आहे हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. पण यापूर्वी असा पाऊस पडत नव्हता का? असा एक भाबडा प्रश्न पडतो.
जुनी जाणती मंडळी म्हणतात..."
आमच्या काळात पावसाळ्यात अखंड पाऊस पडायचा... महिनो- महिने आम्ही घरातून बाहेर पडायचो नाही.... त्यामानाने आता कायच पाऊस पडत नाही... त्यावेळी सुद्धा पूर यायचा... पण पाणी लगेच एक-दोन दिवसात ओसरायचे..."
त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण काळ बदलला, त्याचबरोबर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. ती नदी, तो काळ आणि तसा पाऊस राहिला नाही. पावसाने आपला पॅटर्नच बदलला आहे. हलक्या सरी, संततधार, मुसळधार, अतिमुसळधार या शब्दांची जागा आता ढगफुटीने घेतली आहे. पूर्वी हिमालयात ढगफुटी झाल्याची वार्ता वाचावयास मिळायची. पण आता सर्रास सहयाद्रीच्या पश्चिम घाटातच नव्हे तर आपल्या आजूबाजूला सुद्धा ढगफुटी होत असल्याच्या वार्ता येत आहेत.
महापूराच्या या चारही वर्षात कृष्णा पाणलोट क्षेत्रात नेहमीपेक्षा अति प्रमाणात पाऊस झाल्याची नोंद आहे. किंबहुना 1945 पासूनच्या नोंदीत या महापूर वर्षातच अतिवृष्टी झाल्याची नोंद आढळते. शिवाय धरणांच्या पाणलोट क्षेत्राबाहेर (फ्री कॅचमेन्ट एरिया) म्हणजे ज्याचे पाणी धारणा ऐवजी थेट नदीत पोहोचते आशा प्रदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या सर्वाचा परिपाक म्हणजे महापूर.
जादा पाऊस पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढती उष्णता आहे. अलीकडच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून उष्ण हवेची बाष्प धारण क्षमता जास्त असते. परिणामी मोठमोठे ढग तयार होतात आणि अचानक कोसळतात. हवेतील उष्णता वाढण्यामागे अपरिमित वृक्षतोड आणि हवा प्रदूषण हे प्रमुख कारण आहे.
थोडक्यात, माणूस बदलला म्हणून निसर्ग बदलला; पावसाचा पॅटर्न सुद्धा बदलला आहे. आता एक लक्षात ठेवायचं... पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली की, महापूर येणारच!. त्याला कोणीही अडवू शकत नाही.
हां... काही अभ्यासपूर्ण उपाययोजना केल्यास त्याची तीव्रता कमी होऊ शकते. पण अजून तरी अशा हालचाली होताना दिसत नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा