Breaking

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

*कुरुंदवाड शहराने जपली गणेशोत्सव काळात हिंदू-मुस्लीम एकजुटीचे पवित्र नाते*

 

मशिदीमध्ये श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा

*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरात किंबहुना महाराष्ट्रात सर्वत्र श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या थाटामाटात केली जाते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड या ऐतिहासिक शहरात गणेश उत्सव हा धार्मिक सण  हिंदू बांधवाबरोबर मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

       कुरुंदवाड शहर हे तसं वैचारिक व चळवळीचं ऐतिहासिक शहर म्हणून नावाजलं जातं. या शहराला सामाजिक व धार्मिक प्रगल्भ विचारांची पार्श्वभूमी असल्यामुळे या शहरात हिंदू मुस्लीम बांधव यांच्यामध्ये एकजुटता दिसून येते. देशात, राज्यात व शहरात कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर असो परंतु शहरात मात्र हिंदू व मुस्लिम बांधव भारतीय संविधानाला अनुसरून राष्ट्रीय एकात्मता टिकवत व शिकवत असतात. मोहरम काळात पीरपंजाची प्रतिष्ठापना हिंदू मंदिरात  व गणेशाची प्राणप्रतिष्ठा ही शहरातील सर्वात महत्त्वाच्या ५ मशिदीमध्ये केली जाते.  मानवतेला सर्वोच्च स्थान देणाऱ्या येथील नागरिकांची विचारधारा व कार्यपद्धती ही तशीच परिपूर्ण आहे. या दोन्ही धार्मिक सणांच्या काळात विविध सामाजिक उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रमाची रेलचेल ही मोठ्या प्रमाणात असते.

      कोरोना महामारीच्या काळात ही शासनाच्या सर्व नियमांना अधीन राहून सरकारचा हात बळकट करण्यासाठी येथील जनता व तरुण मंडळे सदैव तत्पर आहेत.

       गणेशोत्सव काळात कुरुंदवाड नगरीत धार्मिक सौहार्दाचे नातं जपण्याचा काम केलं जातं. शहरातील महत्त्वाच्या पाच मशिदीत श्री गणपतीची प्रतिष्ठापना केली असून या माध्यमातून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे परंपरा व विश्वास अबाधित ठेवण्याचे काम केले जाते. हे दोन्ही धार्मिक सण हिंदू व मुस्लीम बांधव एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात.

     कुरुंदवाड शहरातील कुडेखान  मशीद, कारखाना मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद व ढेपणपूर मशीद या पाच मशिदीमध्ये पारंपारिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 

       सन १९८२ मध्ये शहरातील पाच मशिदींमध्ये पीर व गणपतीची एकत्रित प्रतिष्ठापना करण्याची परंपरा कै. गुलाब गरगरे, कै. दिलावर बारगीर, कै.वली पैलवान, कै. नरसू कुरणे, कै. विठ्ठल चोरगे, विलास निटवे, महादेव माळी, आप्पासाहेब भोसले, शंकर पाटील, बापूसाहेब आसंगे, तानाजी आलासे, महावीर आवळे यांच्यासह आदी मंडळींनी सुरु केली आहे.

      खरं म्हणजे आजच्या काळात हिंदू-मुस्लीम या विषयावर प्रचंड मोठ्या दंगली व मारामारी होत असतात. मात्र कुरुंदवाड वासियांनी धार्मिक एकोपा निर्माण करीत महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू व मुस्लिम बांधवांच्या मनात ऐक्याचं घर निर्माण केले आहे हे मात्र सत्य आहे. या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना जय हिंद डिजिटल न्यूज परिवाराकडून मानाचा सलाम....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा