Breaking

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

मुलीच्या आईनं लग्नास विरोध केल्याने एका तरुणानं क्रूरतेचा कळस गाठत निर्घृणपणे केला खून

 


हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी


     देशात येनकेन प्रकारे मारामारी व  खून होत असतात मात्र ही घटना थोडीशी वेगळी असून या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, लग्नासाठी मागणी घातल्यानंतर मुलीच्या आईनं लग्नास विरोध  केल्याच्या कारणातून एका तरुणानं क्रूरतेचा कळस गाठत अत्यंत निर्घृणपणे तिचा खून केला आहे.

     शेतात गवत आणायला गेलेल्या संबंधित महिलेवर आरोपीनं खुरप्यानं सपासप असंख्य वार केले आहेत. हा हल्ला इतका भयानक होता की, संबंधित महिला जागीच गतप्राण झाली आहे.

      ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 11 तासांत शर्तीचे प्रयत्न करून या घटनेची उकल करत आरोपी तरुणाला गजाआड केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

     लता महादेव परीट असं हत्या झालेल्या 42 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर गुरुप्रसाद देवराज माडभगत असं अटक केलेल्या 23 वर्षीय आरोपीचं नाव आहे. संबंधित आरोपी आणि मृत महिला दोघंही कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथील रहिवासी आहे. आरोपी माडभगत यानं काही दिवसांपूर्वी लता परीट यांच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. पण लता परीट यांना विवाहस्थळ पसंत नसल्यानं त्यांनी मुलगी देण्यास नकार देत विरोध केला. त्यामुळे आरोपी माडभगत याला मृत महिला लता परीट यांच्यावर राग होता.

     दरम्यान, शुक्रवारी मृत महिला लता या आपल्या दोन मुलांसोबत शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी शेतातील गवत कापून मुलांकडे देत, दोघांनाही घरी पाठवून दिलं. आणखी थोडं गवत कापून मीही येते असं त्यांनी मुलांना सांगितलं. महिला शेतात एकटीच असल्याची संधी साधत आरोपीनं खुरप्यानं लता यांच्या तोंडावर, मानेवर रागानं बेभान होऊन अनेक वार केले आहेत. या भयंकर हल्ल्यात लता यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, बराच काळ होऊनही आई परत न आल्यानं मुलांनी आणि ग्रामस्थांनी लता यांची शोधाशोध सुरू केली.

     यावेळी गावातील जनार्दन देसाई यांच्या गावंधर नावाच्या शेतातील उसात लता यांचा मृतदेह आढळून आला. आरोपीनं लता यांची हत्या करून त्यांचा मृतदेह गवत आणि उसाच्या पाचटानं लपवून ठेवला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 11 तासांत घटनेची उकल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर शनिवारी त्याला आजरा येथील प्रथमवर्ग यदंडाधिकाऱ्यासमोर हजर केलं असता, न्यायालयानं आरोपी माडभगत याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

     ही घटना अत्यंत निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारी आहे अशा प्रकारची चर्चा पंचक्रोशीत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा