Breaking

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

बाळूमामाचे वंशज मनोहर मामा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल




पुणे : पुन्हा एकदा तथाकथित देव व धर्माच्या नावावर कर्मकांड करून फसवणारी घटना समोर येत आहे. बाळू मामांचे वंशज म्हणवणारे मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांच्याविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक करत 40 लाख रुपये किमतीचा रो हाऊस घेतल्याचं या तक्रार अर्जात नमूद करण्यात आलंय.

      बारामतीतील महेश आटोळे यांनी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मनोहर भोसले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

    बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

     दरम्यान, मनोहर मामा यांनी आटोळे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. मनोहर मामा यांच्यावर गेल्या काही दिवसांत अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. सध्या ते फरार असल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर स्वत:ची बाजू मांडण्यासाठी ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मी कुठेही फरार झालो नाही. तिरुपतीला गेलो होतो. आज आपल्यासमोर आहे. माझ्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न आहे. करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझी विनाकारण बदनामी सुरु असल्याचं मनोहर मामा यांनी म्हटलंय.


100 कोटीचा अब्रुनुकसानाचा दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितले.मी बाळूमामा यांचा वंशज नाही. मी त्यांचा भक्त आहे. गावातील लोकांनी केलेले आरोप खोटे आहेत. माझी शेती आहे. तसंच माझ्याकडे गोकूळ दुधाची एजन्सी आहे. मालिकांसाठी मार्गदर्शन करतो, त्यातून माझ्याकडे इतकी संपत्ती आलीय. मी ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून लोकांचं भविष्य सांगतो. कुठल्याही प्रकारची बुवाबाजी करत नाही, असा दावाही मनोहर मामा यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मी माझ्या कामानिमित्त गेलो होतो. या व्यतिरिक्त त्यांचे आणि माझे काही संबंध नाहीत. गावातील भावकी, तसंच पार्किंगच्या वादातून आपल्यावर हे आरोप केले जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आपली बदनामी करणाऱ्यांविरोधात 100 कोटीचा अब्रुनुकसानाचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.

   आदमापूरचे बाळूमामांचे भक्त आणि करमाळ्यातील मनोहर मामा यांच्यात वाद विकोपाला जात आहे.ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर आदमापूर येथील बाळूमामाचे भक्त आणि करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यावर उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा यांनी आपण बाळूमामाचा वारसदार किंवा शिष्य नसून केवळ भक्त म्हणून सेवा करत आहे. उंदरगाव येथे माझ्या स्वतःच्या शेतात बाळूमामाचे मंदिर उभे केले आहे. येथे दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक येतात केवळ मंदिर आहे म्हणून माझा आणि आदमापूर येथील बाळूमामा संस्थांचा किंवा मंदिराशी कोणताही संबंध नसल्याचेही मनोहर मामा यांनी यावेळी स्पष्ट केले.

      आज ह्या देशात तथाकथित लोक स्व:ताला  देवाचे अवतार मानून व समाजाला फसविण्याचे काम केले आहे.या निमित्ताने अशा घटना पुढे येत असून भक्तगण व जनता यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा