Breaking

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

चिंचवाड मधील निलावंती चौगुले यांचे समाधीपूर्वक निधन

 

प्रा.सुनील चौगुले : विशेष प्रतिनिधी


     चिंचवाड येथील निलावंती अण्णासो चौगुले यांचे वयाच्या 89 व्या वर्षी जैन परंपरेनुसार समाधीपूर्वक निधन झाले. चिंचवाड गावचे माजी उपसरपंच कै. धन्यकुमार चौगुले आणि श्री.महावीर चौगुले यांच्या त्या मातोश्री होत्या. मुळातच धार्मिक ओढ असणाऱ्या निलावंती यांनी गेली 40 वर्षांपासून पायातील चपलांचा त्याग केला होता. तसेच 23 वर्षांपासून त्या दिवसातून एक वेळेसच आहार घेत होत्या. दिवसातून तीन वेळा मंदिरात जाऊन भगवंताचे दर्शन घेणे, दररोज स्वाध्याय मंडळात जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता.मुनिवर्य बाहुबली महाराज आणि मुनी संघासोबत पायी आठ महिने प्रवास करून त्यांनी श्री क्षेत्र सम्मेद शिखरजी या पवित्र स्थळाचे दर्शन घेतले. मुनिसंघासोबत जयपूर ते धर्मनगर (निमशिरगाव) 4 महिने पायी प्रवास करत चौका ( आहार) करण्याचे कार्य त्यांनी केले. एवढेच नव्हे तर गुजरात दंगलीच्या वेळी दोन महिने एकाच ठिकाणी मुनी संघासाठी चौका (आहार) करण्याचे अत्यंत महत्त्वपुर्ण कार्य त्यांनी केले. या प्रत्येक कार्यात त्यांचे पती कै. अण्णासो चौगुले यांचे त्यांना सहकार्य लाभल

गावी असताना आपल्या परिसरातील कोणत्याही गावी पंचकल्याणक महोत्सव असल्यास निलावंती आजी तेथे आवर्जून जायच्या. तेथे नेहमी कोणतेही काम करण्यास त्या सज्ज असत. प्रवचने ऐकणे, आहार करण्यास मदत करणे याप्रकारे त्यांचे काम सुरू असणारच.  नेहमी धार्मिक कामात रममाण असणाऱ्या या आजींना अखंड आयुष्यभरात कोणावरही रागावलेले, दुसऱ्यावर टिका, निंदा करताना कोणीही पाहिले नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी जैन तत्त्वांचे पालन केले असे म्हणावे लागेल. हे धार्मिक कार्य करताना त्यांनी आपल्या मुलांवरही चांगले संस्कार बिंबवले. त्याचाच परिपाक म्हणून त्यांच्या मुलांनीही सतत त्यांच्या या कार्यास आनंदाने मदत केली. सद्याच्या या वृद्धाश्रमाच्या जमान्यात त्यांचा मुलगा कै. धन्यकुमार आणि सुनबाई पुष्पलता यांनी त्यांना नेहमीच साथ दिली, अगदी शेवटपर्यंत. आजपर्यंत आजी विविध धार्मिक ग्रंथ व पुस्तकांचे वाचन चष्म्याशिवाय करायच्या, हे विशेष.

      19 ऑगस्ट रोजी त्यांचा पाय घसरून थोडीशी दुखापत झाली आणि त्या अंथरुणाशी खिळल्या. या वेळी त्यांच्या इच्छेनुसार जिनदेवी माताजी आणि मुनिवर्य यशकिर्ती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना नियम सल्लेखना देण्यात आली. या काळात त्या एक वेळ आंबील आणि डाळिंबाचा रस घ्यायच्या. नंतर हळू हळू आहार कमी करून त्यांनी फक्त पाणी घ्यायला सुरुवात केली आणि शेवटी संपूर्ण अन्नपाण्याचा त्याग त्यांनी केला. अशा रीतीने आज दि. 1 ऑक्टोबर रोजी त्यांनी देहत्याग केला. आजच त्यांच्यावर अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण काळात त्यांच्या सुनबाई पुष्पलता, नातसूना, नातवंडे आणि तिनही मुलींनी त्यांची अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा केली. दररोज मंत्रपठण, धार्मिक पुस्तकांचे वाचन, भक्तांभर स्रोत म्हणणे, माताजी आणि मुनींचे उपदेश घडवून आणणे हे अखंडपणे सुरू होते. अशा धर्मानुरागी निलावंती मातेस शत: शत: प्रणाम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा