'भाजपमध्ये आल्यापासून माझं मस्त, निवांत चाललय. शांत झोप लागते. माझ्या मागे चौकशी नाही की, काही नाही...' हे वक्तव्य आहे पूर्वी काँग्रेस व सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं (Harshvardhan Patil). मावळ येथील एका कार्यक्रमात त्यांनी गंमतीनं हे भाष्य केलं असलं तरी ही सत्यापरिस्थिती आहे. त्यामुळं या वक्तव्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार आल्यापासून सत्ताधारी मंत्री व नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स अशा केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. जवळपास दररोजच छापे व इडी समन्सच्या बातम्या येत आहेत. आणि यातील बहुतेक सर्व कारवाया महाविकास आघाडी व आघाडीशी संबंधित नेत्यांवर होत आहेत. भाजप पक्षाच्या संबंधित कोणत्याही नेत्यावर छापे किंवा इडि समन्स बजावल्याची किंवा त्यांची चौकशी झाल्याची घटना गेल्या दीड वर्षांत क्वचितच पाहायला मिळेल. साहजिकच सत्ताधारी पक्षातील तिन्ही पक्ष सातत्यानं हा आरोप करत आहेत. पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आरोपांना एकप्रकारे बळकटीच मिळाली आहे.
आपल्या भाषणात त्यांनी हा किस्सा जाहीरपणे सांगितला. ' मलाही भाजपमध्ये जावं लागलं, पण तो निर्णय का घेतला तेवढं विचारू नका. ते काँग्रेसच्या नेत्यांना विचारा, असं ते म्हणाले. भाजपमध्ये माझं मस्त, निवांत चाललय. शांत झोप लागते. माझ्या मागे चौकशी नाही फिवकशी नाही, काही नाही,' असे गमतीदार वक्तव्य पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर कार्यकर्त्यांसमवेत सर्वांमध्ये जोरदार हशा पिकला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा