Breaking

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

*शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ(सुटा)ची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*



३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा


प्रा.डॉ. प्रभाकर माने  : मुख्य संपादक

कराड : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ अर्थात सुटाची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साही व प्रसन्न वातावरणात महिला महाविद्यालय कराड येथे प्रा डॉ आर के चव्हाण ( अध्यक्ष सुटा) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

      सुरुवातीस सुटाचे प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.डी.एन.पाटील यांनी उपस्थित मान्यवर व सदस्यांचे स्वागत करून कोरोना महामारीच्या काळात मयत झालेल्या प्राध्यापक व देश बांधवांना  आदरांजली वाहण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच या वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा करणे, मत मांडणे व निर्णय घेणे याविषयीच्या सूचना देण्यात आल्या.

 सभेतील काही महत्त्वाची छायाचित्रे

     यानंतर सुटा अध्यक्ष प्रा डॉ आर के चव्हाण यांच्या परवानगीने सभेला सुरुवात झाली. सदर सभेच्या विषयपत्रिकेवर एकूण आठ विषय होते या सर्व विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विषय क्रमांक सहा न्यायालय प्रकरणाच्या सद्यस्थिती माहिती देत असताना सुटा सांगली जिल्हा समन्वयक व विश्वस्त  प्रा.टी.व्ही. स्वामी यांनी सेट-नेटग्रस्त प्राध्यापकांच्या कॅस बेनिफिटचे मिळणे गरजेचे आहे परतू माननीय सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे . लवकरच त्याचा निकाल अपेक्षित आहे . तसेच संघटनेच्या ऐतिहासिक लढयामुळेच महाराष्ट्र  शासनाला नेट-सेट मुक्त प्राध्यापकांच्या  पेन्शनचा शासन आदेश काढवा लागला हे सुटाच्या न्यायालयीन लढ्याचे यश आहे . नेट-सेट लढा हा अंतिम टप्प्यात असून त्याचा निर्णय ही लवकरच मिळेल. त्याचबरोबर शारीरिक शिक्षण संचालकांना इतर  प्राध्यापकाप्रमाणे लाभ मिळावेत यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. डीसीपीएस, स्टेपअप व काही पेन्शन केसेस प्रलंबित असून त्यासाठी सुटाचा पाठपुरावा सुरु आहे . त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात बोकाळत असलेल्या भ्रष्टाचाराचा ही उल्लेख करीत विद्यापीठालाही त्याचा स्पर्श होत असल्याचे ते म्हणाले.  कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा.सुधाकर मानकर यांनी या काळात मयत झालेल्या प्राध्यापक व परिवारांना वैद्यकीय परिपूर्ती लागू आहे या बाबतची इतंभूत माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याबद्दल सांगितले.

     सुटा अध्यक्ष प्रा.डॉ. आर . के . चव्हाण यांनी नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांच्या संदर्भात जिल्हानिहाय बैठका/ मेळावा आयोजन करण्यासंदर्भात माहिती दिली. तसेच  एआयफुक्टो,एमफुक्टो व सुटा पातळ्यांवरील घडामोडींची विस्तृत माहिती देण्यात आली. तसेच सरतेशेवटी अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणार्‍या विषयावरही चर्चा करण्यात आली व प्रा.डॉ.संतोष जेठीथोर व प्रा.डॉ. गजानन चव्हाण या कार्यकारिणी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली.सुटा संघटना ही फक्त प्राध्यापकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी आहे. एकूणच आज पर्यंतची प्राध्यापकाप्रति असणारी तळमळ, संघर्षमय वाटचाल व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून स्पष्ट झाली.

      सुटा खजिनदार प्रा.डॉ.अरुण शिंदे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व मान्यवर यांचेआभार व्यक्त केले.या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रा.ए.पी देसाई सातारा जिल्हा समन्वयक,प्रा.टी.व्ही.स्वामी सांगली जिल्हा समन्वयक,प्रा. सुधाकर मानकर कोल्हापूर जिल्हा समन्वयक, सुटा अध्यक्ष प्रा.डॉ.आर के चव्हाण,सुटा कार्यवाह प्रा.डॉ.डी.एन. खजिनदार प्रा.डॉ.अरुण शिंदे, कार्यालय कार्यवाह प्रा.यु ए वाघमारे, उपाध्यक्ष प्रा.डॉ.ईला जोगी, प्रा.डॉ.ए.बी.पाटील,सहकार्यवाह प्रा.डॉ.डी.आर.भोसले,प्रा.डॉ. सुहन मोहोळकर, प्रा . युवराज पाटील, प्रा.डॉ. वशिष्ठ गुरमे,प्रा.डॉ. प्रकाश कुंभार व  प्रा.डॉ.आर. जी.कोरबू ( व्य. प .  सदस्य), प्रा एन के मुल्ला,  इतर सर्व मान्यवर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

        या कार्यक्रमाचे नेमकं व उत्तम नियोजन सातारा जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.ईला जोगी व त्यांच्या टीमने अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केले. त्याचबरोबर सुटा कर्मचारी सुखदेव पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

1 टिप्पणी: